भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:35 AM2022-02-10T11:35:03+5:302022-02-10T11:52:04+5:30

निवडणुकीत इंधन दरवाढीचा फटका पक्षाला बसू नये यासाठीच हे दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे

Petrol-diesel prices have been stable for the last two months | भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक?

भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक?

googlenewsNext

कोल्हापूर : नियंत्रण मुक्त असलेले पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत तरीसुद्धा दर स्थिर कसे राहिले रे भाऊ अशी विचारणा लोकांतून होत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, मणिपूर या राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इंधन दरवाढीचा फटका तिथे पक्षाला बसू नये यासाठीच हे दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

निवडणुका जाहीर केल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२१ ला पेट्रोल दरात ५ रूपये ८२ , तर डिझेलमध्ये १२ रुपये २० पैशांनी कपात केली. निवडणुका ७ मार्चला संपणार आहेत. त्यानंतर असेच दर स्थिर ठेवावेत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. दर स्थिर राहण्यासाठी देशात कुठे ना कुठे कायम निवडणुका सुुरु राहिल्या तर बरे होईल, अशीही मिश्किल टिप्पण्णी सर्वसामान्य करत आहेत. केंद्र सरकार राजकीय लाभासाठी भडकलेले दर स्थिर ठेवू शकते याचेच प्रत्यंतर यातून येत आहे.

नोव्हेंबरमधील पेट्रोल-डिझेलचे दर

दिनांक                      पेट्रोल           डिझेल

१ नोव्हेंबर २०२१       ११५-२५        १०४-८०

२ नाेव्हेंबर २०२१       ११५-६०        १०४-८०

३ नोव्हेंबर २०२१       ११५-६०        १०४-८०

करकपातीनंतरचे दर

दिनांक                     पेट्रोल             डिझेल

४ नोव्हेंबर २०२१      १०९.७८          ९२.६०

४ डिसेंबर २०२१       १०९.९०          ९४.१४

४ जानेवारी २०२२     ११०-०९          ९५-६०

४ फेब्रुवारी २०२२      ११०-०९          ९५.६५

महागाई कमी होण्याची अपेक्षा फोल

सध्याचे पेट्रोल, डिझेलचे दर उच्च पातळीलाच आहेत. त्यामुळे पाच रुपये आणि दहा रूपये प्रतिलिटरमध्ये कपात करून सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही. मोठ्या प्रमाणात दर कपात झाल्यास महागाई कमी होईल. अन्यथा पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर महागाईचा डोंब आणखी उसळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

दर असेच राहावेत

जागतिक तेल बाजारात कच्चे तेल (क्रुड) चे गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहेत. तरीसुद्धा तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. यापूर्वी कच्चे तेलात वाढ झाली की तत्काळ दरवाढ होत असे. सध्या मात्र, दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत असेच दर निवडणुकांनंतरही राहावेत अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Petrol-diesel prices have been stable for the last two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.