पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत -राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:38+5:302021-01-13T04:57:38+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढ करून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सध्याचे दर पाहता सरकार या ...
कोल्हापूर : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढ करून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सध्याचे दर पाहता सरकार या माध्यमातून नागरिकांची प्रचंड लूट करत असून, हे दर किमान २५ ते ३० टक्क्यांनी कमी करावेत व गॅस सिलिंडरची बंद केलेली सबसिडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. सोमवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा प्रतिबॅरेल १०९ डॉलर असा दर होता. त्या काळात मनमोहन सरकारने ७४ रुपये प्रतिलिटरने पेट्रोल जनतेला दिले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल ३१ डॉलर असा दर असताना मोदी सरकार ९१ रुपये लिटरने पेट्रोल देत आहे. हे प्रमाण पाहता, केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून प्रचंड लूट करत आहे आणि हा सर्व पैसा कोठे जात आहे, हादेखील संशोधनाचा विषय आहे. शेजारील देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. तरी केंद्र सरकारने किमान २० ते ३० टक्क्यांनी हे दर कमी करावेत व जनतेला दिलासा द्यावा. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, सौरभ कदम, आदित्य चव्हाण, कैलास कांबळे, प्रसाद उगवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो नं ११०१२०२१-कोल-राष्ट्रवादी निवेदन
ओळ : कोल्हापुरात सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
--