पेट्रोल, डिझेल विक्रीत ७५ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:11+5:302021-04-12T04:21:11+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप नियमित सुरू असूनही तेथे ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप नियमित सुरू असूनही तेथे गर्दी अथवा पेट्रोलला मागणी नव्हती. याचा एकत्रित परिणाम म्हणून पेट्रोल, डिझेल विक्रीत ७५ टक्क्यांनी घट झाली.
जिल्ह्यात ३११ पेट्रोल, डिझेल वितरक आहेत. या वितरकांकडून दिवसाला ६ लाख २५ हजार इतके लिटर डिझेल, तर ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. मात्र, दोन दिवसांपासून राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे या वितरकांच्या इंधन विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दोन दिवसांत दिवसाला २५ टक्के इतक्याच इंधनाची विक्री झाली. यात प्रतिदिन डिझेल १ लाख ५६ हजार २५० लिटर, तर पेट्रोल १ लाख ३७ हजार ५०० लिटर विक्री झाले. मागील लाॅकडाऊन काळात नागरिक एनकेन प्रकारेण पेट्रोल, डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करीत होते. मात्र, दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन दिवसांत स्वत:हून नागरिकांनी घरी राहणे पसंत केले आहे. त्यामुळे इंधन विक्रीत ७५ टक्यांनी घट झाली.
कोट
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांनी स्वत:हून घरी राहणे पसंत केले आहे. त्याचाच परिणामस्वरूप पेट्रोल, डिझेल विक्रीत ७५ टक्के इतकी घट झाली आहे. एकवेळ खप कमी झाला तरी चालेल. मात्र, स्वत:ची काळजी नागरिकांनी घेणे क्रमप्राप्त आहे.
-गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन