विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:40+5:302021-08-02T04:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विमानाच्या इंधनापेक्षा (एटीएफ) कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ४८ रुपयांनी, तर डिझेल ३६ रुपयांनी महाग आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विमानाच्या इंधनापेक्षा (एटीएफ) कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ४८ रुपयांनी, तर डिझेल ३६ रुपयांनी महाग आहे. त्यामुळे अनेकांना वाहन चालविणे परवडत नाही. वाहनधारकांचा खर्च दुपटीने वाढला आहे.
वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेलवर रिफायनरी कॉस्ट आणि केंद्र सरकारचा अबकारी आणि विशेष अबकारी कर, रोड टॅक्स, तर राज्य सरकारचा व्हॅट, सेस (उपकर) असल्याने दर वाढत आहेत. याउलट विमानाच्या इंधनावर सेस, कृषी अधिभार असे कर नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन स्वस्त आहे. सध्या त्याचा दर प्रतिलिटर ५५ ते ६० रुपये इतका आहे. कोल्हापूर विमानतळावरून तिरुपती, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी सेवा सुरू आहे. ही सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी विमानतळावर रिफ्युलिंग सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे एचपीसीएल कंपनी एटीएफ इंधनाचा पुरवठा करते. दुचाकी, चारचाकी वाहनांना लागणाऱ्या पेट्रोलचा दर १०८ रुपये, तर डिझेलचा दर ९६ रुपये आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात ४०, तर डिझेलच्या दरामध्ये ३० रुपये वाढ झाली आहे. या दरांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा खर्च वाढला आहे.
पॉइंटर
हा बघा फरक!
विमानातील इंधन एटीएफ : ५५ ते ६० रुपये
पेट्रोल : १०८
डिझेल : ९६
शहरातील पेट्रोल पंप : १६
जिल्ह्यातील पेट्रोल पंप : २५९
शहराला रोज लागणारे पेट्रोल : ५ लाख ५० हजार लिटर
डिझेल : ६ लाख हजार लिटर
शहरातील वाहनांची संख्या
दुचाकी : १२ लाख २१ हजार
चारचाकी : १ लाख ८८ हजार
अवजड वाहने : १ लाख
चौकट
कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी लागतात हजार
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी झाला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्तच्या प्रवासासाठी बहुतांश जण स्वत:च्या वाहनाच्या वापरावर भर देत आहेत. त्यामुळे अधिकतर कुटुंबांचा पेट्रोलचा खर्च वाढला आहे. सर्वसाधारणपणे जर एखाद्या वाहनधारकाला वर्षभरापूर्वी पेट्रोलसाठी दरमहा पाचशे रुपये खर्च येत होता. आता हा खर्च एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पगार कमी, खर्चात वाढ
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे पगारवाढीवर मर्यादा आली आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलबरोबरच सर्व क्षेत्रात महागाई वाढली आहे. वर्षभरापूर्वी पेट्रोलसाठी दरमहा पाचशे रुपये मला लागत होते. आता एक हजार ते बाराशे रुपये मोजावे लागतात. इंधन दरवाढ केंद्र सरकारने कमी करणे आवश्यक आहे.
-दीपक पाटील, गोकुळ शिरगाव
कामानिमित्त मी रोज रेंदाळ ते गोकुळ शिरगाव एमआयडीसी असा प्रवास करतो. दरवाढीपूर्वी मला दर महिन्याला पेट्रोलकरिता १३०० रुपये खर्च करावे लागत होते. सध्या २८०० रुपयांपर्यंत हा खर्च गेला आहे. इंधन दरवाढीने आम्हा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
-विजय मोहिते, रेंदाळ
010821\01kol_1_01082021_5.jpg
डमी (०१०८२०२१-कोल-स्टार ९८४ डमी)