पेट्रोल दरवाढीत इंधन कंपन्यांची मखलाशी

By admin | Published: June 17, 2015 12:59 AM2015-06-17T00:59:29+5:302015-06-17T01:05:13+5:30

ग्राहकांमधून संताप : साडेपाच महिन्यांत १२.५२ रुपयांनी घसरण, तर २३ रुपये ९० पैशांनी वाढ

Petrol price hiked fuel companies | पेट्रोल दरवाढीत इंधन कंपन्यांची मखलाशी

पेट्रोल दरवाढीत इंधन कंपन्यांची मखलाशी

Next

गणेश शिंदे -कोल्हापूर
गेल्या साडेतीन महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात भरमसाट वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. पेट्रोलचे दर कमी करताना पैशांत करायचे आणि वाढविताना रुपयांत वाढवायचे, अशी मखलाशी इंधन कंपन्या करीत असल्याने ग्राहकांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत पेट्रोलच्या दरात १२ रुपये ५२ पैशांची घसरण झाली. पण, तब्बल २३ रुपये ९० पैसे वाढ करून कंपन्यांनी सामान्य नागरिकांना झटका दिला आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या (१२ जून २०१५पर्यंत) आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल प्रतिलिटर ५९ रुपये ९६ पैशांना आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत तेल कंपन्यांनी १२ रुपये ५२ पैशांनी पेट्रोलचे दर कमी केले असताना याच कालावधीत तब्बल २४ रुपयांची वाढ केली. कमी करताना पैशांत आणि वाढविताना रुपयांत, असा नवीन फंडा तेल कंपन्यांनी सुरू केला आहे. कंपन्यांच्या या मखलाशीमुळे नागरिकांत कमालीचा असंतोष पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर शेजारच्या कर्नाटक व गोवा या राज्यांमध्ये इंधनाचे दर कमी आहेत. गोव्यात सुमारे पाच ते सात रुपयांनी, तर कर्नाटकात डिझेल अडीच रुपयांनी कमी दरात मिळते आहे. याचाही फटका महाराष्ट्रातील उद्योजकांना बसत आहे. केंद्रामध्ये भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक काळात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत या सरकारने इंधनाचे दर कमी करून ‘अच्छे दिनां’ची सुरुवात केलीही होती; पण त्यानंतर इंधनाच्या दरात दरमहा वाढ करीत ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे.


आठ वेळा कमी; चौदा वेळा वाढ
वर्षभरात इंधनाचे दर आठ वेळा कमी झाले; पण त्याचबरोबर १४ वेळा त्याच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. महिन्यातून दोन वेळा हे दर बदलतात. ३० डिसेंबर २०१४ अखेर पेट्रोलचा दर ६९ रुपये ९८ पैसे होता, तो आता ७५ रुपयांवर गेला आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व भारतातील दरांमध्ये फार तफावत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सरकारी करांचा बोजा अतिरिक्त असल्यामुळे किंमत कमी झाल्याचा फायदा ग्राहकाला मिळत नाही.
- सिद्धार्थ हुकेरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, कोल्हापूर.


सामान्यांना इंधन स्वस्त मिळावे, ही अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे दर स्थिर राहल्यामुळे महिन्याने ही दरवाढ झाली.
- गजकुमार माणगांवे, अध्यक्ष, पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन.

Web Title: Petrol price hiked fuel companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.