जिल्ह्यात पेट्रोल पंप मंजुरीचा धडाका

By admin | Published: October 29, 2014 12:43 AM2014-10-29T00:43:47+5:302014-10-29T00:44:05+5:30

प्रक्रिया डिसेंबरअखेरपर्यंत : एचपीसीएल आणि आयओसीएलचे ९५ प्रस्ताव

Petrol pump approval in the district | जिल्ह्यात पेट्रोल पंप मंजुरीचा धडाका

जिल्ह्यात पेट्रोल पंप मंजुरीचा धडाका

Next

संदीप खवळे - कोल्हापूर -जिल्ह्यात नवीन वर्षात नवीन पेट्रोल पंपांना मंजुरी देण्याचा धडाकाच सुरू होणार आहे़ येत्या वर्षात जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ९५ पेट्रोल पंप सुरू होणार आहेत़ दोन्ही कंपन्यांनी जिल्ह्यात डीलरशिप नेमण्यासाठी जाहिरात दिली आहे़ यामध्ये ‘एचपीसीएल’च्या ५७, तर ‘आयओसीएल’च्या ३८ प्रस्तावित पेट्रोल पंपांचा समावेश आहे़ डीलरशिपसाठीची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे़
प्रस्तावित नवीन पेट्रोल पंपामुळे जिल्ह्यातील पेट्रोलियम व्यावसायिकांमध्ये टोकाची स्पर्धा सुरू होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ ‘एचपीसीएल’ने जाहिरात दिल्यानंतर केवळ एका दिवसाच्या अंतराने ‘आयओसीएल’ने डीलरशिपच्या प्रस्तावाची जाहिरात दिली आहे़ दोन्ही कंपन्यांच्या जाहिरातीतील डीलरशिपसाठी आवश्यक असलेले निकष, प्रस्तावित पेट्रोल पंपांची ठिकाणे आणि निवडीची पद्धत पाहिल्यास या व्यवसायातील तीव्र स्पर्धेची कल्पना येते़
टोकाची स्पर्धा, पेट्रोलची गळती, बँ्रडेड पेट्रोल आणि आॅईलच्या खपाची सक्ती, उधारी अशा अनेक गर्तेत सापडलेल्या पेट्रोल व्यवसायाला नवीन पेट्रोल पंपांमुळे तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे़ हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी कोल्हापूर शहर परिसर आणि जिल्ह्यात विविध राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर तसेच ग्रामीण भागांमध्ये ५७ ठिकाणी; तर इंडियन आॅईल कॉर्पोरेशन ही कंपनी ३८ ठिकाणी डीलरशिप सुरू करण्यासाठी मंजुरी देणार आहे़ एचपीसीएल लॉट्स आणि बोली पद्धतीने ही निवड करणार आहे, तर आयओसीएल ड्रॉ पद्धतीने अंतिम प्रस्तावासाठी निवड आहे़
सध्या शहर आणि जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या तीन कंपन्यांचे सुमारे ११२ पेट्रोल पंप आहेत़ पेट्रोल-डिझेल व्यवसायाला वाढती स्पर्धा, कंपन्यांचे ब्रँडेड पेट्रोल, आॅईलची सक्ती, उधारी आणि कमी खप या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ कोट्यवधी रुपये खर्चूनही जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे़ जुने पंपधारकच या स्पर्धेत टिकून आहेत़ नवीन पेट्रोल पंपांमुळे या समस्या आणखी उग्र रूप धारण करणार असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे़
डीलरशिप देण्यासाठी जागेची मालकी अथवा भाडेकरार, अनामत रकमेची आवश्यकता असते़ साहजिकच भाडेकरार, जमिनीचे मूल्य आणि डीलरशिपसाठी लागणारी अनामत रक्कम, कामगारावरील खर्च यांचा विचार केल्यास पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च होतो़ इतके करूनही विक्रीचे उद्दिष्ट न गाठल्यास पंपांना सोयीसुविधा देण्यात कंपन्या हात आखडतात़ स्पर्धेमुळे खपावर परिणाम होऊन हा खर्च भरून काढण्यात सद्य:स्थितीत अनेक पेट्रोल पंपधारक अयशस्वी झाल्याचे चित्र आहे़ पेट्रोल आणि डिझेल व्यवसायातील मार्जिन हे अनुक्र मे तीन व दोन टक्के आहे़ त्यामुळे दैनंदिन होणारा खर्च लक्षात घेतल्यास किमान दोन हजार लिटर पेट्रोलची विक्री झाली, तरच हा व्यवसाय किफायतशीर ठरतो. अशातच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपांची खैरात करणे सुरू केल्यामुळे हा व्यवसाय करणे जुन्याबरोबरच नव्यांनाही त्रासदायक आहे़, असे मत व्यावसायिकातून व्यक्त केले आहे़

इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे शहर आणि जिल्ह्यातील प्रस्तावित प्रमुख पेट्रोल पंपांचे स्थान पुढीलप्रमाणे -
संभाजीनगर ते कळंबा, कोल्हापूर ते गगनबावडा - नगरपालिका हद्दीत, कळंबा ते कात्यायनी रस्ता, रंकाळा तलाव ते साने गुरुजी वसाहत, शिरोली ते कागल, मुडशिंगी ते राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ४, बालिंगा, वारणा-कोडोली, बांबवडे-सरुड.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख प्रस्तावित पेट्रोल पंपाचे स्थान पुढीलप्रमाणे : आऱ के.नगर, कोल्हापूर, गोकुळ शिरगाव ते कागल, पारगाव, गडमुडशिंगी ते सांगवडे, गोकुळ शिरगाव ते कणेरी मठ, चंदगड - राज्य महामार्ग १८९, गडहिंग्लज, कळंबे तर्फ ठाणे, तुरंबे.

केवळ प्रतिष्ठेपोटी पेट्रोल व्यवसायात अनेक नवखे लोक उतरू पाहत आहेत़ त्यांनी या व्यवसायातील नकारात्मक बाबी डोळसपणे पाहाव्यात़ शासनाने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर तोटा होतो, अशी ओरड करणाऱ्या कंपन्या स्पर्धेतही पेट्रोल पंपांची खैरात का करीत आहेत.
- अमोल कोरगावकर : माजी अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल विक्रेते असोसिएशन.

Web Title: Petrol pump approval in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.