इंधन दरवाढीविरोधात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना दुरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:32+5:302021-03-07T04:22:32+5:30
इचलकरंजी : सततच्या इंधन दरवाढीविरोधात येथील नागरिकांनी पेट्रोल पंपावर सवाद्य दुरडी नेऊन उपहासात्मक पंपावरील कर्मचारी आणि वाहनधारकांना लाडू, केळी ...
इचलकरंजी : सततच्या इंधन दरवाढीविरोधात येथील नागरिकांनी पेट्रोल पंपावर सवाद्य दुरडी नेऊन उपहासात्मक पंपावरील कर्मचारी आणि वाहनधारकांना लाडू, केळी वाटल्या. यावेळी शासनाचा निषेध करत महागाई कमी करण्याची मागणीही करण्यात आली.
सततच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. या विरोधात राजकीय पक्ष, संघटना आंदोलनेही करत आहेत. शनिवारी येथील राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शिवेच्या मारुती मंदिराजवळील सोसायटी पेट्रोल पंपावर सवाद्य दुरडी नेली. त्या ठिकाणी सुवासिनी महिलांनी दुरडीची पूजा केली आणि इंधन दरवाढीचा निषेध करत कर्मचारी, वाहनधारकांना लाडू, केळी वाटल्या. शासनाचा निषेध करत महागाई कमी करून जनतेला दिलासा देण्याची मागणी केली. या आंदोलनात दाविद कांबळे, भारत कांबळे, हर्षद म्हाकवे, वंदना शिंदे, मीना शिंदे, शांता भाईमाने यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.