कोल्हापूरात गणेशोत्सव-मोहरम एकोप्याचे दर्शन, संस्थानकाळापासून परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:15 AM2018-09-21T11:15:09+5:302018-09-21T11:22:42+5:30
समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थानकाळापासून करवीरनगरीला लाभली आहे.गणेशोत्सव व मोहरम बत्तीस वर्षांनंतर एकत्रित आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण हिंदु-मुस्लीम सलोख्याचे आहे. कोल्हापूर शहरांसह जिल्ह्यांतही सुमारे पन्नासहून अधिक तालमीत मोहरम व गणेशोत्सव एकत्रित साजरा होत आहे.
कोल्हापूर : समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थानकाळापासून करवीरनगरीला लाभली आहे.गणेशोत्सव व मोहरम बत्तीस वर्षांनंतर एकत्रित आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण हिंदु-मुस्लीम सलोख्याचे आहे. कोल्हापूर शहरांसह जिल्ह्यांतही सुमारे पन्नासहून अधिक तालमीत मोहरम व गणेशोत्सव एकत्रित साजरा होत आहे.
बाबूजमाल, सरदार तालीम, नंगीवली तालीम, अवचितपीर तालीम, तुकाराम माळी तालीम, पंचगंगा तालीम, खंडोबा तालीम, गंगावेश तालीम, जय मंडळ, आदी ठिकाणी गणेशमूर्ती व पंजे यांची एकत्रित प्रतिष्ठापना केली आहे.
गुरुवार पेठेतील बाबूजमाल तालीम मंडळ दर्गा येथे ‘हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा’, बेबी फातिमा पंजा, तर खरी कॉर्नर परिसरातील अवचितपीरचा ‘सात अस्मान के बादशहा ‘शेर-ए खुदा मौला अली अवचितपीर’, शिवाजी पेठेतील सरदार तालीम मंडळाचा ‘चाँदसाब’ पंजा, नंगीवली तालीम मंडळाचा ‘हजरत पीर नंगीवली साहेब’ पंजा या पंजांसह तुकाराम माळी तालीम मंडळ, पंचगंगा तालीम मंडळ, जय मंडळ या ठिकाणी गणेशमूर्ती व पंजे यांची एकत्रितपणे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.