‘फुलेवाडी’ पुढील फेरीत

By admin | Published: March 21, 2015 12:18 AM2015-03-21T00:18:37+5:302015-03-21T00:19:35+5:30

साईनाथला नमविले : दसरा चषक फुटबॉल स्पर्धा

'Phoolwadi' in the next round | ‘फुलेवाडी’ पुढील फेरीत

‘फुलेवाडी’ पुढील फेरीत

Next

कोल्हापूर : सुरुवातीपासून आक्रमक फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने साईनाथ स्पोर्टस्ला ४-१ अशा गोलने नमवून शुक्रवारी दसरा चषक फुटबॉल स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला.येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारी साडेचारच्या सुमारास सामना सुरू झाला. त्यात प्रारंभी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी खोलवर चढाया केल्या; पण समन्वयातील अभावाने त्यांचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही. त्यातच ‘फुलेवाडी’च्या तेजस जाधवने सामन्याच्या २९ व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाचे खाते उघडले. त्यावर लगेचच दुसऱ्या मिनिटाला ‘साईनाथ’च्या हृषीकेश पाटीलने चेंडूला गोलजाळीत धाडून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना बरोबरीत असल्याने दोन्ही संघांनी वेगवान खेळ सुरू केला. त्यात सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला अजित पोवारच्या पासवर सुशांत अतिग्रेने हेडद्वारे चेंडूला गोलजाळीत धाडून ‘फुलेवाडी’ला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात योग्य चाली रचत ‘फुलेवाडी’, तर गोलची परतफेड करून आघाडी मिळविण्यासाठी ‘साईनाथ’चे खेळाडू मैदानात उतरले. त्यातील ‘फुलेवाडी’च्या मोहित मंडलिकने ‘डी’च्या बाहेरून मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. त्याने केलेली आणखी चढाई ‘साईनाथ’चा गोलरक्षक योगेश हिरेमठने थोपवून लावली. ‘साईनाथ’कडून नीलेश साळोखे, आशिष चव्हाण, संतोष चौगुले यांच्या चढाया अपयशी ठरल्या. उत्तरार्धाच्या अखेरीस ‘फुलेवाडी’ आक्रमक झाली. त्यांच्या तेजस जाधवने सामन्याच्या ७० व्या, तर रोहित जाधवने अजित पोवारच्या कॉर्नर किकवर सामन्याच्या ७६व्या मिनिटाला गोल करून संघाला एकूण चार गोलची आघाडी मिळवून दिली. त्याची परतफेड करण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश आले नाही. अखेर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने ४-१ अशा गोलने विजय मिळवित पुढील फेरी गाठली. ‘फुलेवाडी’च्या अजित पोवार, सुशांत अतिग्रे, रौनक कांबळे यांनी उत्कृष्ट खेळ केला. ‘साईनाथ’कडून नीलेश साळोखे, आशिष चव्हाण, संतोष चौगुले, वैभव सावंत, वीरधवल जाधव यांनी चांगली झुंज दिली. (प्रतिनिधी) 

आजचा सामना : खंडोबा तालीम मंडळ (अ) विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ (दु. ४ वा.)

Web Title: 'Phoolwadi' in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.