पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:42 PM2023-10-11T15:42:57+5:302023-10-11T15:45:23+5:30

नवीन छायाचित्रासह ओळखपत्र मिळाल्याचा आनंद क्षणात मावळला

Photo of woman on identity card of men, Malpractice of Election Commission exposed in Kolhapur | पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड

पुरुषांच्या ओळखपत्रावर महिलेचा फोटो, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार कोल्हापुरात उघड

सरवडे : निवडणूक आयोगाने त्यांच्या कारभारात कितीही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला, तरी बऱ्याचदा त्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे पाहावयास मिळते. असाच एक प्रकार निदर्शनास आला असून सरवडे ( ता. राधानगरी ) येथील एका पुरुषाच्या मतदान ओळखपत्रावर चक्क महिलेचा फोटो छापला आहे. त्यामुळे पोस्टाने मिळालेले हे चुकीचे ओळखपत्र हातात पडताच त्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

सरवडे येथील आनंदा शिवा कांबळे यांनी जुन्या मतदान ओळखपत्रावरील आपले छायाचित्र बदलण्यासाठी ते अपडेट केले होते. निवडणूक आयोगाने पोस्टाने पाठवलेले नवीन मतदान ओळखपत्र त्यांच्या राहत्या पत्त्यावर सुमारे महिनाभराने मिळाले. परंतु पाकीट उघडताच त्यावरील फोटो पाहून आनंदा कांबळे यांचा नवीन छायाचित्रासह ओळखपत्र मिळाल्याचा आनंद क्षणात मावळला.

आयोगाने पाठवलेल्या या ओळखपत्रावर आनंदा कांबळे यांचे नाव बरोबर छापले असून त्यांच्या जागी एका स्त्रीचा फोटो वापरला आहे. शिवाय लिंग या पर्यायासमोर स्त्री असेही चुकीचे छापले आहे. पत्त्यामध्ये ही सरवडे ऐवजी सारवडे असे नमूद केले आहे. हे विचित्र ओळखपत्र पाहून हसावे की रडावे, असा प्रश्न त्यांच्या मनाला पडला. या प्रकारामुळे आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

Web Title: Photo of woman on identity card of men, Malpractice of Election Commission exposed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.