कृष्णविवराचे छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:31 AM2019-04-26T00:31:29+5:302019-04-26T00:31:33+5:30
डॉ. व्ही. एन. शिंदे क्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान ...
डॉ. व्ही. एन. शिंदे
क्षणाक्षणाला सेल्फी काढायच्या आणि सोशल मीडियावर टाकायच्या जमान्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर कृष्णविवराच्या छायाचित्राला स्थान मिळाले. काय आहे या छायाचित्राचे एवढे महत्त्व? हा प्रश्न मनात येणे सहज शक्य आहे. कृष्णविवरे आहेत, चांगले टेलिस्कोप आहेत, आधुनिक छायाचित्रे टिपणारे तंत्रज्ञान आहे, तरीही या छायाचित्राला एवढे महत्त्व मिळाले. कारण हे तितकेच दुर्मीळ छायाचित्र आहे. ते मिळविण्यासाठी जगभरातील कित्येक वर्षे शेकडो संशोधक प्रयत्न करत होते. शेवटी कृष्णविवराचे देखणे छायाचित्र २०१९ मध्ये मिळाले.
कृष्णविवर हे ताऱ्याचे अंतिम रूप आहे. ती कोणत्याही ताºयाची अंतिम अवस्था असते. एका विशिष्ट ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा कृष्णविवर तयार होते. सर्व तारे अणुंचे बनलेले आहेत. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. केंद्रकाभोवती विविध कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. हे इलेक्ट्रॉन दोन अणूंमध्ये अंतर राखण्यास मदत करतात. या ताऱ्यांमध्ये आण्विक शृ्रंखला प्रक्रिया सुरू असते. त्यातून प्रचंड ऊर्जा तयार होते. तीच प्रकाशाच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असते.
अखेर ताºयांतील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. त्यानंतर त्यापासून तयार झालेल्या हेलियमचे ज्वलन सुरू होते. हेलियमही संपतो तेव्हा ताºयाचा इतर भाग केंद्रकाकडे खेचला जातो. तारा जितका मोठा असेल तितके त्याचे आयुष्य कमी असते. जेव्हा ताºयाचे आयुष्य संपते तेव्हा त्यात प्रचंड घडामोडी होतात. त्याचे सर्व वस्तुमान केंद्राकडे जाते. अणू केंद्रकाच्या बंधनातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि त्याचे आकारमान खूप कमी होते. मात्र, वस्तुमान तसेच राहते. परिणामी, त्याचे गुरुत्वाकर्षण प्रचंड वाढते. ते इतके जास्त असते की, त्यापासून प्रकाशही सुटू शकत नाही. जे त्याच्या कक्षेत जाते ते सर्व आत शोषले जाते. बाहेर काहीच येत नाही. म्हणूनच त्याला ‘कृष्णविवर’ असे म्हणतात. अमर्याद लहान आणि कमालीचे जड.
या अवस्थेत भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत. या बिंदूभोवती एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडून आत गेलेले काहीच परत येत नाही. त्यामुळे हे प्रकरण आहे काय? याचा पुरेसा अंदाज कोणालाच नाही. या मर्यादेचे उल्लंघन केल्यानंतर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने वस्तू केंद्रकाकडे जाते. सूर्यापेक्षा तिप्पट मोठ्या ताºयाचे कृष्णविवरात रूपांतर होते, असे भारतीय वंशाचे संशोधक चंद्रशेखर यांनी शोधले. प्रकाशदेखील जेव्हा बाहेर पडू शकत नाही तेव्हा हे कृष्णविवर आपण पाहू शकत नाही. मात्र, हॉकिंग यांना ‘अशा कृष्णविवरात गेल्यास परत येता येणार नाही. मात्र, आपण नव्याच विश्वात प्रवेश करू’, असे वाटत होते. कृष्णविवरातील माहिती अनेक गोष्टींचा उलगडा करेल, असे ते म्हणत. कृष्णविवरे ही आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असावीत, असे संशोधकांचे मत आहे. आकाशातील असंख्य तारे अशा कृष्णविवराभोवती फेºया मारत आहेत.
क्षकिरणांच्या शोधानंतर अशा कृष्णविवरांचे अस्तित्व संशोधकांनी मान्य केले. एखादा तारा कृष्णविवराच्या जवळ गेल्यास तो आत जाताना अवकाशात असे क्षकिरण तयार करतात. अशा गूढ कृष्णविवराचे छायाचित्र असल्याने त्याची बातमी झाली नसती तरच नवल.
(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)