छायाचित्रकाराच्या आत्महत्येचे राजकारण
By admin | Published: November 1, 2015 01:17 AM2015-11-01T01:17:05+5:302015-11-01T01:26:04+5:30
भाजपच्या नगरसेवकाने धमकी दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख : शिवसेना, राष्ट्रवादीची गुन्हा दाखल करण्याची मागणी
कोल्हापूर : खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड येथील आनंद फोटो स्टुडिओच्या मालकाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदराव दत्तात्रय चौगले (वय ६५, रा. पोवार गल्ली, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. चौगले यांनी भाजपचे नेते व विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.
चौगले हे गेल्या चाळीस वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसायात होते. त्यांचा खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड येथे ‘आनंद फोटो स्टुडिओ’ आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सकाळी सहा वाजता फिरायला बाहेर पडले. त्यांचे धाकटे भाऊ दिनकर चौगले हे सकाळी साडेआठच्या सुमारास स्टुडिओ उघडण्यास आले. यावेळी दुकानाचे शटर अर्धवट उघडले होते. आतील दरवाजाचे कुलूपही काढले होते. त्यामुळे त्यांना सुरुवातीस चोरीचा संशय आला. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता आनंदराव यांनी सीलिंंग फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. शेजारील देवराज गुळवणी याला त्यांनी बोलावून घेतले. त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवारासह जुना राजवाडा पोलिसांना कळविले. कॉन्स्टेबल विराज डांगे, विजय कुंभार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता टेबलावर चिठ्ठी सापडली. ती त्यांनी जप्त केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात विच्छेदनासाठी आणला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
मतदारच नसतील तर मी कशाला धमकावू ? : आर. डी.पाटील
आत्महत्या केलेले आनंदराव चौगले हे माझ्या ओळखीचे असले तरी ते माझी मुलगी ज्या प्रभागातून सध्या निवडणूक लढवीत आहे, त्या महालक्ष्मी मंदिर (प्रभाग क्रमांक ३३) प्रभागातील मतदारच नाहीत. त्यामुळे त्यांना धमकाविण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही त्यांच्या आत्महत्येची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांना शनिवारी दिले. निवेदनात म्हटले आहे, माझ्या राजकीय विरोधकांनी त्यांचा पराभव होणार या भीतीने माझी पत मलिन करण्यासाठीच माझ्यावर आरोप केला आहे. विरोधकांनीच आत्महत्येच्या ठिकाणी माझ्या नावाची चिठ्ठी टाकली असून, ती लगेच सोशल मीडियांमध्ये प्रसिद्ध केली आहे.
चिठ्ठीत चौघांची नावे
आनंदराव चौगले यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक आर. डी. पाटील, त्यांची दोन मुले राजा व सुनील तसेच महापालिका सफाई कामगार धनाजी शिंदे यांच्या नावासह अन्य गुंडांनी धमकी दिल्याचा उल्लेख आहे.
चिठ्ठीतील मजकूर असा :
मी स्वत:हून लिहीत आहे, माझ्या माय-माउली जनतेला त्रिवार वंदन. मी तुमच्या सान्निध्यात वाढलो, सेवा करण्याची संधी मिळाली. आपणही माझ्यावर अनंत उपकार केले. मी कधीही, कोणाला फसविले नाही, हे आपण जाणत आहात. मी आपला ऋणी आहे. मी व नगरसेवक आर. डी. पाटील एकाच ताटात जेवणारे. त्यांना मी पहिल्या निवडणुकीमध्ये बहुमोल सहकार्य केले आहे. त्यांचे देणे-घेणेही त्यावेळी दिलेले आहे; परंतु इतक्या वर्षांनी ते मला धमक्या देऊ लागले आहेत. कधी चाकूचा, तर कधी पिस्तुलाचा धाक दाखवित आहेत. त्यांच्याकडे पिस्तूल आहे. ते मी पंचवीस वर्षांपूर्वी चालवूनही पाहिले आहे. त्यावेळी आमचे संबंध चांगले होते. कधी आर. डी. स्वत:, तर त्यांचा मुलगा दुकानात घुसून धमकी देत असे. पालिकेचा सफाई कामगार धनाजी शिंदे याच्यासोबत काही गुंडही दुकानात पाठविले होते. मी तक्रार केली नाही; कारण त्यांचे पोलिसांत वजन आहे. तेथे आमची कोण दाद घेणार? धमक्यांमुळे मला हल्ली झोप लागत नाही. त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला. माझी माय-माउली जनताच निर्णय देईल. जनतेसारखी न्यायदेवता नाही. (प्रतिनिधी)