गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 29, 2023 12:18 PM2023-12-29T12:18:02+5:302023-12-29T12:19:25+5:30
एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ
इंदुमती गणेश
कोल्हापूर : नव्या फ्लॅटसाठी माहेराहून पैसे आण, नवी गाडी घेऊन द्यायला सांग, नोकरी लावून द्या, नोकरीसाठी पैसे द्या अशा पुरुषसत्ताक पद्धतीच्या शारीरिक व मानसिक छळांपासून विवाहिता व बालकांचे आयुष्य वाचवायचे असेल तर तिला शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनविणे हाच शाश्वत उपाय आहे. मुलगी सासरी दिली की आपली जबाबदारी संपली, ही पालकांची मानसिकता, सून-पत्नी ही अधिकार गाजविण्यासाठीच असते हा अहंकार आणि आपलं कुणी नाही ही अगतिकता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.
गारगोटी येथील विवाहितेने दोन वर्षांच्या बाळासह आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. ही प्रातिनिधिक घटना असली तरी पिढ्यानपिढ्यांपासून समाजात हेच घडत आले आहे. कारणं वेगवेगळी असली तरी विवाहितेचा आणि बालकांचा बळी हेच अंतिम सत्य ठरते.
शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनवा..
आर्थिक सक्षम असलेल्या स्त्रीमध्ये कोणत्याही प्रसंगाला धाडसाने निभावून नेण्याचा आत्मविश्वास आपसूक येतो. त्यामुळे मुलींना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण देणे व त्यानंतर नोकरी, व्यवसाय किंवा कलाकौशल्याने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. असे झाले तर पैशासाठी होणारा छळ कमी होईल. छळ झालाच तर ती घराबाहेर पडून स्वत:चे व मुलांचे पालनपोषण करू शकेल इतकी सक्षम राहील.
माहेरचीही तितकीच जबाबदारी
एकदा तुझं लग्न करून दिलं ना आाता तू तिथेच जगायचं..तुझा शेवटही तिथेच ही पालकांची मानसिकता मुलींसाठी घातक आहे. आपण न सासरचे ना माहेरचे या टोकाच्या विचारापर्यंत मुली जातात. आधीच वर्षानुवर्षे छळ सोसताना आलेली अगतिकता असह्य झाल्यावर आपल्या पाठीशी कोणी नाही याची जाणीव आत्महत्येला प्रवृत्त करते. त्यामुळे पालकांनी वेळीच दखल घेऊन या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तिला मदत केली पाहिजे.
समुपदेशक, कायद्याची मदत घ्या
छळाला मृत्यू हा अंतिम पर्याय असू शकत नाही. त्यातून सुटका व्हायची असेल तर समुपदेशकांची, महिला तक्रार निवारण कक्षाची, भरोसा सेलसारख्या विभागाची मदत घ्या. समजुतीने किंवा कायद्याच्या धाकाने फरक नाहीच पडला तर वेगळे राहून किमान शांत आयुष्य जगता येते.
मुलगी मिळेपर्यंत पुरेवाट..
एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ हाेतो हे दोन टोकाचे विरोधाभास समाजात दिसतात.
स्त्रियांसाठी अनेक कायदे असले तरी समाजाची मानसिकता बदलणे आणि शिक्षणातून आर्थिक स्वावलंबन हाच कायमस्वरुपी उपाय आहे. पत्नी किंवा सून मिळाली हेच खूप महत्त्वाचे आहे. माहेरकडून हुंडा पाहिजेच कशाला, यावर सासरच्या मंडळींचे प्रबोधन झाले पाहिजे. -ॲड. मंजूषा पाटील
मुलगी किमान २१ वर्षांची झाल्याशिवाय, मुलाच्या कुटुंबीयाची पूर्णत: चौकशी केल्याशिवाय लग्न करू नये. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी उघडे आहेत याचा विश्वास आणि समान हक्क दिला पाहिजे. पत्नी, सून, आई या भूमिका निभावताना व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र अस्तित्व जपले पाहिजे. - अनुराधा मेहता, महिला दक्षता समिती.