‘गडहिंग्लज’चा ऊस लवकर उचला
By admin | Published: November 16, 2015 10:45 PM2015-11-16T22:45:50+5:302015-11-16T23:59:15+5:30
सदस्यांची मागणी : पंचायत समितीच्या सभेत साखर कारखानदारांना आवाहन
गडहिंग्लज : यंदा पावसाअभावी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व तलावांमध्ये निम्मादेखील पाणीसाठा झालेला नाही. त्या तलावांच्या पाण्यावर अवलंबून असणारा ऊस वाळत आहे. त्यामुळे तो ऊस परिसरातील संबंधित कारखानदारांनी लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केली.
सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. कमी पावसामुळे उद्भवलेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि तलावातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेऊन ऊसतोडणीचे नियोजन व्हावे. यासंदर्भात महसूल, पाटबंधारे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कारखानदारांची बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी अमर चव्हाण यांनी केली. त्यास बाळेश नाईक यांनी अनुमोदन दिले.
शासनाच्या विविध योजनेतून तालुक्यात नाले व ओढ्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांवर झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यातील गाळ काढून त्या बंधाऱ्यांची स्वच्छता करावी आणि त्यामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. त्यासंदर्भात कृषी व जलसंधारण विभागाने खास कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना अॅड. हेमंत कोलेकर यांनी केली.
सामानगडावरील सात कमानी विहिरीची स्वच्छता करून ते पाणी आजूबाजूच्या टंचाईग्रस्त गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. नरेवाडी व शिंदेवाडी येथील बदली झालेल्या ग्रामसेवकांची ४-५ महिने चार्जपट्टी का झालेली नाही? असा सवाल नाईक यांनी विचारला.
बचत गटांसाठी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून ती इमारत लवकरात लवकर वापरात आणावी, अशी सूचना कोलेकरांनी केली. त्याचबरोबर सरोळी येथील अंगणवाडीचा प्रश्नदेखील तातडीने निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असतानाच सामानगडावरील विश्रामगृहांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे त्याच खात्याने त्यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करून द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली, तर त्याच्या बांधकामाचीच चौकशी करावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
मुंगूरवाडी आणि हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रांना पूर्णवेळ डॉक्टर कधी मिळणार? अशी विचारणा नाईक यांनी केली. नूल ते नंदनवाड आणि नौकुड ते चिंचेवाडी या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी विविध खात्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्र. गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. यावेळी सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार
गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी तालुक्यात राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद घेऊन ‘नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन’तर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. उपसभापती तानाजी कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.