बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:59 PM2020-06-03T21:59:53+5:302020-06-03T22:00:49+5:30

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

Pick up vegetables at night in the market committee | बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

बाजार समितीत भाजीपाल्याचा रात्रीच उठाव

Next
ठळक मुद्दे त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो.

राजाराम लोंढे ।

कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे दोन महिने नियोजनबद्धरीत्या प्रयत्न सुरू आहेत. सौद्यावेळी सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होते, तेथील गर्दी टाळण्यासाठी खरेदीदारांनी रात्री अकरा ते अडीचपर्यंत भाजीपाल्याची खरेदी सुरू केली असून, रात्री व सकाळी अशा दोन टप्प्यांत खरेदी होत असल्याने गर्दी कमी करण्यात यश आले आहे.

रोज सुमारे ६०० खरेदीदार ६० टक्के (७०० क्विंटल) भाजीपाल्याची रात्री ‘मोघम’मध्येच खरेदी करतात, त्यातील शिल्लक कलम सकाळी सौद्यात लावून त्याचा दर काढला जात आहे. बाजार समितीत रोज स्थानिकासह सांगली व कर्नाटकातून भाजीपाला येतो. हा भाजीपाला कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाठविला जातो. भाजीपाला खरेदीसाठी रोज सौद्यात ११०० खरेदीदार भाग घेत असल्याने गर्दी होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, तरीही खरेदीदारांची संख्या आणि खरेदीची वेळ पाहता गर्दी रोखताना सगळ्यांचीच दमछाक होत आहे.

सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.


समितीची २४ तास यंत्रणा सक्रिय
रोज सायंकाळी सातपासूनच शेतकऱ्यांचा माल येण्यास सुरुवात होते. त्यानंतर अकरा वाजल्यापासून खरेदीदार येत असल्याने २४ तास सुरक्षा आणि वसुलीची यंत्रणा समितीने कार्यरत केली. त्यामुळे यंत्रणेवर ताण आहे.

सकाळी दहालाच मार्केट शांत
एरवी दुपारी एकपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी असायची. मात्र, रात्रीची खरेदी सुरू झाल्यापासून सकाळी दहा वाजता सगळा माल संपल्याने एकदम शांतता जाणवते.
 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खरेदीदारांबरोबरच अडत्यांनीही प्रतिसाद दिला. मोघम जरी मालाची खरेदी होत असली तरी प्रत्येक कलमातील शिल्लक मालाचा सौदा काढणे बंधनकारक आहे.
- मोहन सालपे , (सचिव, बाजार समिती)

Web Title: Pick up vegetables at night in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.