नदीतून काढलेल्या जलपर्णींचे ढीग उचला; अन्यथा पालिकेच्या दारात टाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:36+5:302021-03-04T04:44:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे एखाद्या मैदानासारखे दृश्य निर्माण झाले आहे. शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे एखाद्या मैदानासारखे दृश्य निर्माण झाले आहे. शहरातील सामाजिक संघटना आणि नगरपालिकेने जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घेतली. परंतु गेल्या चार दिवसांपासून काढलेल्या जलपर्णींचे ढीग काठावर तसेच साचून राहिले आहेत. त्यामुळे नव्याने काढल्या जाणाऱ्या जलपर्णी टाकण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या जलपर्णींचे ढीग ताबडतोब हलवावेत; अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात जलपर्णी टाकू, असा इशारा पै. अमृत भोसले यांनी दिला.
पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे पै. भोसले यांनी व्यंकोबा मैदान येथील पैलवानांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर दोन दिवसांनी नगरपालिकेला जाग आली. त्यांनीही यांत्रिक बोटीसह काही मनुष्यबळ दिले. या माध्यमातून काढण्यात आलेल्या जलपर्णी घाटावरच ढीग मारून ठेवल्या आहेत. त्या नियमित उचलल्या असत्या, तर कुजल्यामुळे सुटणारी दुर्गंधी तसेच नवीन काढलेल्या जलपर्णी टाकण्यासाठी जागा मिळाली असती. नगरपालिकेला तेवढेही कष्ट घेण्याची तसदी नको आहे का? असा संतप्त सवाल करीत जलपर्णी काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच भोसले यांनी जलपर्णी नगरपालिकेच्या दारात टाकण्याचा इशारा दिला.
चौकट 'अर्थ' नसल्याने दुर्लक्ष
प्रत्येक कामात काही 'अर्थ' आहे का, हे शोधून काम करणाऱ्या नगरपालिकेच्या 'कारभाऱ्यां'ना या जलपर्णी काढून टाकण्याच्या कामात काहीच 'अर्थ' नसल्याचे वाटल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे का, अशी खरमरीत टीकाही सोशल मीडियावर सुरू आहे.