न्यू वाडदेचे सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांच्या घरांवर दगडफेक

By admin | Published: November 4, 2016 12:56 AM2016-11-04T00:56:41+5:302016-11-04T00:56:41+5:30

सात जखमी : दोनशे लोकांच्या जमावाने केली चाल

The picketing of the new Sarpanch of the Vadde | न्यू वाडदेचे सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांच्या घरांवर दगडफेक

न्यू वाडदेचे सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांच्या घरांवर दगडफेक

Next

उचगाव/गांधीनगर : न्यू वाडदे (ता. करवीर) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सरपंच, उपसरपंचासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्यांच्या समर्थकांनी सरपंच दत्तात्रय पाटील व समर्थकांच्या घरांवर तुफान दगडफेक केली. यात तीन महिलांसह चौघेजण जखमी झाले. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण होते. गावात जलद कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
३१ आॅक्टोबरला रस्त्यावरील चारचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून दत्तात्रय पाटील व रोहित पाटील यांच्यात वादावादी झाली होती. तसेच पूर्ववैमनस्य व निवडणुकीच्या वादाची झालर या घटनेला होती. गुरुवारी सायंकाळी रोहित याला जुन्या वादातून सुरेश पाटील व जमावाने मारहाण केली. दरम्यान, रोहितला वाचवण्यासाठी गेलेले प्रशांत बाळासाहेब पाटील, आनंदा बाबूराव पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत हे तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी न्यू वाडदेचे सरपंच दत्तात्रय बाळासाहेब पाटील, उपसरपंच सुरेश गुंडा माने, सुरेश बाळासाहेब पाटील, भिकाजी सावंत, गणेश ढोकरे, नंदकुमार पाटील, जगू पाटील (सर्व रा. न्यू वाडदे वसाहत) सचिन कुर्ले,
प्रकाश कुर्ले, सुनील कुर्ले, विनायक कुर्ले, शिवाजी कुर्ले, सागर कुर्ले (रा. कुर्लेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, रोहित व प्रशांत यांना मारहाण झाल्याचे समजताच त्यांच्या दोनशे समर्थकांनी तलवारी, कोयता, स्टिक्स, गज, स्टॅम्प, बाटल्या, दगड घेऊन सरपंच दत्तात्रय पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष मारुती शिंदे यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत भास्कर दिनकर पाटील (वय ४४), आनंदी दादू ढोकरे (६५), मनीषा मारुती शिंदे व आणखी एक महिला जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी दगडाचे खच पडले होते. यावेळी सरपंचांच्या दुचाकीचे नुकसान झाले. तसेच हनुमान दूध संस्थेच्या दारावर दगड पडले होते, तर सरपंचांच्या घरावरील पत्र्यावर दगड पडल्याने तो फुटला आहे. गावातील लोक घराची दारे-खिडक्या बंद करून
बसले होते.
या घटनेनंतर न्यू वाडदे येथे तणाव होता. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जलद कृती दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: The picketing of the new Sarpanch of the Vadde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.