गडहिंग्लजच्या बाजारात लोणच्याचे आंबे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:26+5:302021-06-22T04:17:26+5:30
गडहिंग्लज : लोणचं म्हटलं की जेवणाला वेगळीच चव. त्यासाठी लागणारे आंबे सोमवारी गडहिंग्लज बाजारात दाखल झाले. शेकडा २०० ते ...
गडहिंग्लज : लोणचं म्हटलं की जेवणाला वेगळीच चव. त्यासाठी लागणारे आंबे सोमवारी गडहिंग्लज बाजारात दाखल झाले. शेकडा २०० ते २५० रुपयांनी तर ३० ते ४० रुपये डझन दरानेही किरकोळ विक्रीही काही शेतकऱ्यांनी केली. जून महिन्यातील मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसावेळी या आंब्याची शेतकरी काढणी करतात.
गडहिंग्लज विभागात नेसरी परिसरात तसेच आजरा व चंदगड भागात लोणच्यांच्या आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तळकोकणातही या जातीची झाडे आहेत. या झाडांना मोहोर उशिरा येत असल्याने त्याची फळेही ऐन पावसाळ्यात येतात. लोणच्या आंब्यांना भरपूर चीक व आंबटपणा असतो. त्यामुळे पिकल्यावरही हा आंबा चवीला आंबटच लागतो. त्यामुळे कच्चे असताना हे आंबे लोणच्यासाठी वापरतात. काढणीवेळी आंबा खाली पडू नये म्हणून झाडावर चढून जाळीच्या सहाय्यानेच आंबे उतरले जातात. आंबा खाली पडला, दगडाचा किंवा काठीचा मार लागला तर आंब्यांना काळे डाग पडून लवकर खराब होतात. त्यामुळे काळजीपूर्वक आंबे उतरावे लागतात.
गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले, महागाव, नेसरी, चंदगड, पोश्रातवाडी, कोळींद्रे, आजरा व परिसरातील अन्य खेड्यापाड्यांतून गडहिंग्लजला आंब्याच्या विक्रीसाठी शेतकरी येतात. आंब्याच्या उत्पादनासाठी विशेष लागवड कोण करत नाही. शेतीच्या बांधावर पूर्वीपासून असलेली किंवा नव्याने उगवून आलेली मोठी झालेली झाडे शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर सांभाळली आहेत.
पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा निर्माण झाल्यावरच आंब्याचे लोणचे घातले जाते. जास्त काळ टिकून राहण्यासाठी अशा वातावरणाची गरज असते. लोणच्याचा आंबा आणि फणसाची आवकही एकाचवेळी होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील बाजारपेठेत लोणचे आंब्यांची आवक सुरू झाली आहे. पोश्रातवाडी (ता. आजरा) येथील धाकोजी खंडागळे आंबे विक्री करताना.
क्रमांक : २१०६२०२१-गड-०५