शिरढोणमध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:11+5:302021-01-02T04:21:11+5:30
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुरंगी लढत स्पष्ट झाली आहे. स्थानिक बाणदार गट, खंजिरे गट व स्वाभिमानी ...
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुरंगी लढत स्पष्ट झाली आहे. स्थानिक बाणदार गट, खंजिरे गट व स्वाभिमानी संघटना विरुद्ध सा. रे. पाटील गट, भाजप, शिवसेना अशी लढत होत आहे. प्रभाग पाचमधून बाणदार गटाने एक उमेदवार बिनविरोध करून खाते उघडले असले तरी उर्वरित सर्वच प्रभागात दोन्ही गटांनी तोडीस तोड उमेदवार दिल्याने काट्याची लढत होणार आहे.
१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत आजपर्यंत बाणदार विरुद्ध खंजिरे गट अशीच लढत होत होती. या निवडणुकीत पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. बाणदार यांच्या विरोधात लढणारे स्वाभिमानी संघटना, खंजिरे गटातील प्रमुख शिलेदार ग्रामपंचायत निवडणुकीत बाणदार गटाबरोबर युती केल्याने ग्रामस्थांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
विरोधी सा. रे. पाटील गट, भाजप, शिवसेनेने तगडे उमेदवार दिल्याने कडवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात बाणदार यांचा कारभार, पाणीप्रश्न गाजणार असून, अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार , हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.