आजऱ्यातील चित्री, आंबेओहोळ, खानापूर धरणे तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:51+5:302021-07-24T04:16:51+5:30
आजरा : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने चित्री, आंबेओहोळ व खानापूर ही धरणे आज तुडुंब भरली. दोन दिवसांत चित्री धरणात ...
आजरा : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने चित्री, आंबेओहोळ व खानापूर ही धरणे आज तुडुंब भरली. दोन दिवसांत चित्री धरणात चाळीस टक्के इतका उच्चांकी पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने हिरण्यकेशी व चित्री नदींना महापूर आला आहे. रात्री उशिरा हिरण्यकेशी काठावर असलेल्या रामतीर्थवरील राम मंदिरात पाणी घुसले. दुपारी कमी झालेला पाऊस सायंकाळी पुन्हा कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
चित्री धरणाच्या सांडव्यातून १२०८, तर विद्युतगृहातून १८० असे १३८८ क्युसेकने, तर एरंडोळ व धनगरवाडी ही धरणे यापूर्वीच भरली असून त्यामधून ३५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री प्रकल्प भरल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. काल व आज पडलेल्या पावसाने नदी व ओढ्या काठच्या जमिनीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काल रात्रीपासून रामतीर्थवरील राम मंदिरात तीन फूट पाणी आहे. हिरण्यकेशी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तालुक्यातील चित्रीसह अन्य धरणाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी एम. एल. मळगेकर यांनी दिली.
पहिल्याच वर्षी आंबेओहोळ धरण तुडुंब
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप संपलेला नसताना घळभरणी झालेले आंबेओहोळ धरण तुडुंब झाले. सांडव्यातून ७५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पहिल्याच वर्षी अगदी महिनाभरातच हा प्रकल्प तुडुंब झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो कॅप्शन - चित्री धरण तुडुंब भरल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी.