चित्र-शिल्प..सुरांतून श्यामकांत सरांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 01:47 PM2020-01-20T13:47:52+5:302020-01-20T13:50:57+5:30

कोल्हापूर : प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट..हिरव्यागार गालिचावर कोवळ्या उन्हाचा सडा...बासरीची फुंकर आणि संतुराच्या छेडलेल्या तारांतून उमटणारा सप्तस्वर.. पांढऱ्या कॅनव्हासवर ...

Pictures and crafts..Suras paid homage to Shyamakant sir | चित्र-शिल्प..सुरांतून श्यामकांत सरांना आदरांजली

कोल्हापुरातील टाऊल हॉल बागेत ‘रंगबहार’ संस्थेच्या वतीने आयोजित मैफल रंगसुरांची कार्यक्रमात निर्मला कुलकर्णी यांना डॉ. नलिनी भागवत यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विलास बकरे, संजीव संकपाळ, इंद्रजित नागेशकर, डॉ. भारत खराटे, किशोर पुरेकर, रियाज शेख, व्ही. बी. पाटील, धनंजय जाधव, विजय टिपुगडे, अजेय दळवी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देचित्र-शिल्प..सुरांतून श्यामकांत सरांना आदरांजलीटाऊन हॉल बागेत रंगली मैफल : ‘रंगबहार’चे आयोजन

कोल्हापूर : प्रसन्न सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट..हिरव्यागार गालिचावर कोवळ्या उन्हाचा सडा...बासरीची फुंकर आणि संतुराच्या छेडलेल्या तारांतून उमटणारा सप्तस्वर.. पांढऱ्या कॅनव्हासवर कलात्मकरित्या फिरणाऱ्या ब्रशने रंगरेषांतून आकाराला आलेल्या प्रतिमा... मातीतून साकारलेले व्यक्तिशिल्प अशा कलांच्या सादरीकरणाने रविवारी रंग-सुरांच्या मैफलीतून ‘रंगबहार’ने श्यामकांत जाधव सरांना कलांजली वाहिली. कलाविष्काराने भारलेल्या मैफलीला सरांच्या अनुपस्थितीच्या वेदनेची झालर होती.

कोल्हापूरच्या कलाकारांसाठी व्यासपीठ खुले करून देणाऱ्या रंगबहार संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे टाऊन हॉलच्या बागेत रंगसुरांची मैफल बहरली. कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर, विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्यासह श्यामकांत जाधव यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

यावेळी ‘रंगबहार श्यामकांत जाधव स्मृती गौरव पुरस्कार’ डॉ. नलिनी भागवत यांच्या हस्ते कलाशिक्षिका निर्मला कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला तसेच आबालाल रेहमान पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारत खराटे उपस्थित होते.

यावेळी निर्मला कुलकर्णी यांनी श्यामकांत सरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, कलाकारांनी आणी रसिकांनी ही मैफल श्यामकांत सर नसल्याने भरलेली असूनही रिकामी जाणवत आहे.

‘रंगबहार’च्या स्थापनेपासून मी या कलाचळवळीचा एक भाग आहे. श्यामकांत जाधव यांनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे. हा वटवृक्ष असाच बहरत राहावा आणि वाढावा यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करावेत.

नलिनी भागवत म्हणाल्या, श्यामकांत जाधव हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेसाठी कार्यरत राहिले. ‘कलानिकेतन’चे विद्यार्थी असल्यापासूनचा त्यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. ते उत्तम लेखक होते पण ‘आबालाल रेहमान’ पुस्तकाच्या प्रकाशनाला ते नाहीत याची खंत आहे.

‘रंगबहार’ ही राज्यातील एकमेव अशी कलासंस्था आहे जी कोणत्याही व्यावसायिक उद्देशाविना केवळ कलेच्या आणि कलाकारांच्या उन्नतीसाठी काम करते. संस्था अशीच यापुढेही कार्यरत राहो.

श्रीकांत डिग्रजकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी विजयमाला मेस्त्री, इंद्रजित नागेशकर, व्ही. बी. पाटील, संजीव संकपाळ, विजय टिपुगडे, अजेय दळवी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सुरेश शिपूरकर, किशोर पुरेकर, अतुल डाके, सुरेश मिरजकर, रियाज शेख, सर्जेराव निगवेकर, सुधीर पेटकर, रमेश बिडकर, विलास बकरे, सागर बगाडे यांच्यासह कलाकार व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाधिस्थळ..रचनाचित्र, कंपोझिशन..रांगोळी

या मैफलीत चित्र-शिल्पांसह विविध कलाप्रकारांतील कलाकारांनी कलाकृती सादर केल्या. रविवारी नर्सरी बागेत राजर्षी शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळा सुरू होता. टाऊन हॉलमधून हे दृश्य सहज दिसत होते. चित्रकार मंगेश शिंदे यांनी या स्मारकाचे चित्र रेखाटून शाहूंना अभिवादन केले.

याशिवाय कलाकारांनी रचनाचित्र, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, देवदेवता, कंपोझिशन यासह शिल्पकलेतही व्यक्तिशिल्प, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, रचनात्मक शिल्प सादर केल्या. सविता शेळके यांनी रांगोळीच्या माध्यमातून निसर्गाचे सौंदर्य मांडले. शिल्पकारांमध्ये मंदार लोहार या शालेय विद्यार्थ्याने तयार केलेले स्त्री शिल्प रसिकांच्या पसंतीस उतरले.

बासरीचा सूर..संतुराच्या तारा

मैफलीत एकीकडे चित्र-शिल्पकारांचा कलाविष्कार सुरू होता तर दुसरीकडे रंगमंचावर बासरी वादन आणि संतुराच्या तारांनी रसिकांची सकाळ मंत्रमुग्ध केली. सोहम जगताप ने संतूर वादनातून राज गुजरी तोडी सादर केली.

सोहम राधाबाई शिंदे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. त्यानंतर बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांचे बासरी वादन झाले. त्यांने राग शुद्ध सारंगमधील विलंबित एकताल व दृत तीनताल सादर केले. मलया मारूतम ही मिश्र खमाज धून सादर केली. त्यांना प्रशांत देसाई यांनी तबला साथ केली.

तीन वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ८० वर्षांचे तरुणही..

यंदा ही मैफल सर्व कलाकारांसाठी खुली ठेवण्यात आली होती. अगदी तीन वर्षांच्या चिमुकल्या मुला-मुलींपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी आपली चित्रकलेची हौस यात भागवून घेतली. लहान मुले आपल्या कल्पनाशक्तीने आवडते चित्र रेखाटत होते.

काहींनी तयार चित्रे रंगविली. काहीजण पेन्सिल स्केच काढत होते. तर काहीजण कॅनव्हासवर रंगांची मुक्त उधळण करत होते. वयोवृद्ध चित्रकारांनीदेखील या रंगोत्सवात सहभाग घेत मैफलीचा आनंद घेतला. एरव्ही मैफलीत मोजकेच कलाकार सादरीकरण करतात यंदा मात्र ७० हून अधिक कलावंतांनी त्यात सहभाग घेतल्याने पूर्ण बागेचा परिसर कलावंतांनी व्यापून गेला होता.

सहभागी कलाकार

शिल्पकार : सुनील चौधरी, अजित चौधरी, मंदार लोहार, चित्रकार : आकाश मोरे, मंगेश शिंदे, अनिल कसबेकर, दिगंबर पाटील, अभिजित जाधव, पुष्कराज मेस्त्री, अनुराधा क्षीरसागर, सुनील कुलकर्णी, पिसाळ, शुभम माने, अभिजीत कांबळे, वैभव पाटील, गणेश कोकरे, सुनील पंडित, विजय उपाध्ये, योगेश सुतार, विलास बकरे, सई कोळेकर, तुषार पवार, बापू सौंदत्ती, किशोर राठोड, रजेंद्र वाघमोरे, मणिपद्म हर्षवर्धन, सत्यजित निगवेकर, स्नेहल पोतदार, वेद वायचळ, अनंत भोगटे, संजय शेलार, बिडकर, समृद्धा पुरेकर, अशोक धर्माधिकारी, विवेक कवाळे, कविता बंकापुरे, विपुल हळदणकर, स्नेहल पाटील, सुरेश पोतदार, श्रद्धा पोंबुर्से, अक्षय जाधव, स्वरूपा भोसले, शैलेश राऊत, संदीप पोपेरे, वैशाली पाटील, स्वयं बिडकर, नितीन गावडे, समाधान हेंदळकर, आरिफ तांबोळी, यांच्यासह लहान कलाकार.
 

 

 

Web Title: Pictures and crafts..Suras paid homage to Shyamakant sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.