स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 02:09 PM2021-02-26T14:09:26+5:302021-02-26T14:11:59+5:30

Sarpanch Grampanchyat Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३८ गावांतील सरपंचपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ८७ गावांत स्थानिक आघाड्यांचे सरपंच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षांनेही घवघवीत यश मिळविले.

Pictures of local fronts in 87 villages, Sarpanch in six talukas | स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र

स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र

Next
ठळक मुद्दे स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र राष्ट्रवादी, शिवसेनेसह जनसुराज्यला चांगले यश

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २३८ गावांतील सरपंचपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ८७ गावांत स्थानिक आघाड्यांचे सरपंच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षांनेही घवघवीत यश मिळविले.

अनेक उलथापालथी, सदस्य फोडाफोडी, इर्षेमुळे या निवडी अत्यंत चुरशीने झाल्या. निवडीनंतर गावे गुलालाने न्हावून निघाली. या निवडीचे बरेवाईट परिणाम पुढील कांही महिने गावोगावी अनुभवायला येणार आहेत.

या सहा तालुक्यातील कांही गावांतील सरपंच आरक्षणास न्यायालयात आव्हान दिल्याने सरपंच निवडी लांबणीवर पडल्या होत्या. भुदरगड तालुक्यातील ४५ पैकी १८ गावांतील सरपंच निवडी गुरुवारी झाल्या. उर्वरित २७ गावातील निवडी आज शुक्रवारी होत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी या निवडणुका सत्तेतील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्रित विरुद्ध भाजप अशा फारशा झाल्या नव्हत्या. गावनिहाय गटातटाचे सोयीचे राजकारण पाहून स्थानिक आघाड्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र आल्या होत्या. त्यामुळे त्याचेच प्रतिबिंब सरपंच निवडीत पडल्याचे दिसत आहे.

लोकमतने २३८ गावांतील पक्षनिहाय संख्याबळ देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यात पुरेशी स्पष्टता नाही. कारण हे एकाच पक्षाचे यश नाही. सरपंच एका पक्षाचा झाला असला तरी गावांत सत्ता अनेक पक्षांच्या स्थानिक गटांनी एकत्रित येऊन जिंकली असल्याने एकाच पक्षाची सत्ता आली असे म्हणणे धाडसाचे आहे. एकाच पक्षाची व स्पष्ट बहुमत मिळालेली गांवे फारच कमी आहेत. त्यामुळे पक्ष, नेते व गटांनी सरपंच आपलाच असा दावा केला आहे.

सरपंचपदाचे तुकडे

काही गावांत स्थानिक आघाडीतील सर्व गटांना सामावून घेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेतील तीन महिन्यांच्या महापौरसारखे सरपंचपदही वर्षाला वाटून घेण्यात आले आहे. पाच वर्षात कोण कोणत्या वर्षी सरपंच होणार हे निश्चित झाल्यावरच काही गावांत निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

नाराजी अशीही...

शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे सरपंच आपल्या गटाचा झाला नसल्याच्या नाराजीतून सात सदस्यांनी लगेच राजीनामा दिला आहे.

सरपंच पद रिक्त
गडहिंग्लज तालुक्यातील आरळगुंडी येथे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिला सदस्या नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले.

दावेच जास्त..

सगळ्यात जास्त संभ्रम शिरोळ तालुक्यात राहिला. त्या तालुक्यात एकूण ३३ गावांत सरपंच निवडी होत्या, परंतु आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी २२, काँग्रेसच्या गणपतराव पाटील गटाने १५, माजी आमदार उल्हास पाटील यांनी १२ गावांत आपलेच सरपंच झाल्याचा दावा केला आही. सरपंच ३३ व दावे केलेली गावे ५० असे चित्र तिथे तयार झाले आहे.

पन्हाळ्यात जनसुराज्य..
आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळा तालुक्यात चांगले यश मिळविले. काही गावांत त्यांना अमर पाटील गटाची मदत झाली. शाहूवाडीत जनसुराज्यला काँग्रेसच्या करणसिंह गायकवाड गटाची ताकद मिळाली.

  • एकूण सरपंच निवडी : २३८
  • स्थानिक आघाडी : ८७
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ३६
  • शिवसेना : ३५
  • जनसुराज्य शक्ती : ३७
  • जनसुराज्य-काँग्रेस आघाडी : १२
  • काँग्रेस : २०
  • भाजप : ०८
  • जद : ०२
  • रिक्त : ०१

Web Title: Pictures of local fronts in 87 villages, Sarpanch in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.