गृहिणींचे आर्थिक गणित बिघडणार ग्रामीण भागातील चित्र : दूध दराच्या आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:51 PM2018-07-19T23:51:18+5:302018-07-19T23:52:09+5:30

 Pictures of rural areas in poor condition of poor women: | गृहिणींचे आर्थिक गणित बिघडणार ग्रामीण भागातील चित्र : दूध दराच्या आंदोलनाचा फटका

गृहिणींचे आर्थिक गणित बिघडणार ग्रामीण भागातील चित्र : दूध दराच्या आंदोलनाचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देदूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ

गणपती कोळी ।
कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात दर वाढून मिळण्याची आशा असली तरी सध्या मात्र अवस्था बिकट झाली आहे.

शेतीबरोबर पशूपालन हा दुय्यम व्यवसाय मानला जात असला तरी ग्रामीण भागात सामान्य व मध्यमवर्गीयांचा दुग्ध उत्पादन हाच मुख्य व्यवसाय बनला आहे. शेतीच्या पिकाच्या उत्पन्नातून आर्थिक उलाढाल पुरुष मंडळी करतात. मात्र, घरचा रोजचा खर्च मुख्यत्वे महिलाच दुधाच्या उत्पन्नातून चालवीत असतात.

ग्रामीण भागात सामान्य व मध्यम वर्गातील कुटुंबात गृहिणीच गायी-म्हशींचा सांभाळ करतात. पुरुष मंडळींचा यामध्ये फारसा हस्तक्षेप नसतो. दर दहा दिवसाला दूध बिल गृहिणींच्या हातात येत असल्याने या पैशातून आठवडी बाजार, मुलांचा शाळेसह इतर किरकोळ खर्च चालविला जातो. त्यामुळे दुधाच्या उत्पन्नावरच घरचा रोजचा चरितार्थ चालतो. गाय दूध अनुदानाच्या प्रश्नावरून गेले तीन दिवस दूध संकलन बंद झाले आहे. जनावरांचा चारा, पशुखाद्यावरील खर्च रोजचा आहेच. मात्र, दुधच स्वीकारले जात नसल्याने उत्पन्न थांबले आहे.

एका म्हशीचे दोन वेळचे मिळून फक्त तीन लिटर दूध झाले तरी दहा दिवसाला १५०० रुपये बिल मिळते. पशुखाद्य व इतर कपात होऊन किमान एक हजार रुपये मिळतात. मात्र, तीन दिवस दूध बंद असल्याने गृहिणींचे आठवड्याच्या खर्चाचे गणित बिघडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चिंताग्रस्त असून, रोजच्या काढलेल्या दुधाला कोण ग्राहक मिळतो का? याच्या शोधात आहेत. एखादा ग्राहक भेटला की दुधाला दुसऱ्या दिवशीही येण्याची विनंती करताना दिसत आहेत. त्यामुळे दूध आंदोलन व त्याचा परिणाम ग्रामीण भागातच तीव्रतेने जाणवत असून, संप एकदा मिटवा, अशी केविलवाणी हाक महिला करीत आहेत. एकूणच दुधाचे आंदोलन त्यावरून होणारे राजकारण चालत असले तरी ग्रामीण भागातील महिलांचे अर्थकारण बिघडत आहे.

दुधाची साय विद्यार्थ्यांच्या ओठांवर
कुंभोज : दूध बंद आंदोलनादरम्यान दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी जीव टांगणीला लागला असताना दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा दूध उत्पादक अगदी उत्स्फूर्तपणे गोठ्यातून दूध थेट शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आणून देऊ लागले आहेत. एव्हाना घरी दूध पिण्यासाठी टंगळमंगळ करणाºया शाळकरी मुलांना गेले दोन दिवस मसाले दुधाची मेजवानी मिळू लागल्याने शाळेतील पोरं मात्र खूश झाली आहेत...!

गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाढीव दूध दरासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. परिणामी, दूध संघांकडून केले जाणारे ग्रामीण भागातील दूध संकलन बंद आहे. हातकणंगले तालुक्यातील वारणा तसेच पंचगंगाकाठच्या सर्रास गावात शेतीपूरक दुग्ध व्यवसायाची भरभराट आहे. प्रत्येक गावातून अंदाजे तीन ते पाच हजार लिटर दूध संकलन होत असते. तथापि आंदोलनामुळे दूध उत्पादकांसमोर दुधाचे करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यायाने छोटे दूध उत्पादक म्हशीचे दूध घरी खवा बनविण्यासाठी तर काहीजण शेजाºयापाजाºयांना वाटत आहेत. गाय दूध उत्पादक मात्र गोठ्यातील ताजे दूध थेट गावातील प्राथमिक शाळेत आणून देत आहेत. काही मोठ्या विद्यार्थी पटाच्या शाळांनी आवाहन करताच यास आणखीन प्रतिसाद मिळत असून, शाळांतील पोषण आहाराबरोबरच मसाले दूध बनवून विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याने विद्यार्थी जाम खूश झाले आहेत.

Web Title:  Pictures of rural areas in poor condition of poor women:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.