वृद्धेचा निर्घृण खून करून केले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:22+5:302021-02-11T04:27:22+5:30

कोल्हापूर : दहा तोळे दागिन्यांसाठी वृद्धेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव मार्गावरील ...

Pieces made by the brutal murder of an old man | वृद्धेचा निर्घृण खून करून केले तुकडे

वृद्धेचा निर्घृण खून करून केले तुकडे

Next

कोल्हापूर : दहा तोळे दागिन्यांसाठी वृद्धेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव मार्गावरील कृषी विद्यापीठाच्या माळावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

शांताबाई शामराव आगळे-गुरव (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. दिवसभर शाेधाशोध करून पोलिसांना मृतदेहाचे शिर, डावा हात, कमरेखालील पायांपर्यंतचा भाग असे तीन अवशेष वेगवेगळ्या गोणपाटात सापडले. पोलिसांनी तातडीने शोधाशोध करून काही तासांतच मृतदेहाची ओळख पटवून संशयित आरोपी संतोष निवृत्ती परीट (३५,रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) याला अटक केली. त्याने खुनाची कबुुली दिल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी सांगितले.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलाव या मार्गावर कृषी विद्यापीठाच्या माळरानावर काहीजण मॉर्निंग वॉक करीत होते. त्यांना कचऱ्याच्या ढिगामध्ये गोणपाटात गुंडाळलेला महिलेचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोणपाटातून मृतदेह बाहेर काढला असता, फक्त कमरेखालील पायापर्यंतचा भाग आढळला. त्यामुळे महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जिल्ह्यातील मीसिंग व्यक्तींबाबत वायरलेसवरून माहिती घेतली. त्यावेळी करवीर पोलीस ठाण्यात पाचगावची शांताबाई आगळे ही वृद्धा शुक्रवारपासून (दि. ५) बेपत्ताची नोंद होती. त्यांच्या मिरजकर तिकटी येथील अनिता जगताप व महावीर महाविद्यालय परिसरातील शर्मिला साळोखे या दोन्हीही मुलींना तातडीने बोलावले.

दरम्यान, पोलिसांनी इतर अवशेषांची शोधाशोध केली असता, त्यावेळी शंभर फूट अंतरावर बाभळीच्या झाडाखाली गोणपाटात वृद्धेचा डावा हात, तर तेथून १०० मीटरवर खुरट्या झुडपात शिर सापडले. पोलिसांनी मृत आगळे यांच्या मुलींना मृतदेह दाखवताच त्यांनी तो आईचा असल्याचे सांगितले.

दरम्यान, मृताची मुलगी शर्मिला साळोखे यांच्या घरी इस्त्रीचे कपडे देण्यासाठी संतोष परीट याचा वावर होता. त्यातून त्याची शांताबाई आगळे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी शुक्रवारी परीट हा आगळे यांच्या पाचगावमधील घरी गेला. देवकार्य करायचे आहे असे सांगून त्यांना मोपेडवरून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परीट याला अटक केली. त्यानंतर त्याने शुक्रवारीची खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांचा कसून तपास

मृतदेहाचे तुकडे केले की मोकाट जनावराने कुरतडून त्याचे तुकडे केल्याने ते विखुरले याचीही पोलीस खातरजमा करीत आहेत. खून कोठे केला? कशाने केला? याचाही पोलीस शोध घेत आहेत. पण, या खुनामध्ये आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात चर्चेली जात होती.

अद्याप धड गायब

मृतदेहाचे इतर अवशेष मिळाले असले तरीही अद्याप धड मिळाले नसल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अवशेष तुटलेल्या ठिकाणी काळे ठिक्कर पडले होते. त्यामुळे तुकडे केल्यानंतर त्यावर ॲसिड टाकल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

फोटो नं.१००२२०२१-कोल-खून०१,०२,०३

ओळ : कोल्हापुरात सरनोबतवाडी टोल नाका ते राजाराम तलावदरम्यान कृषी विद्यापीठाच्या माळावर शांताबाई आगळे या वृद्धेचा खून करून त्याचे तुकडे करून फेकल्याचा प्रकार घडला. ते मृतदेहाचे अवशेष शोधताना पोलीस. (फोटो : आदित्य वेल्हाळ)

फोटो नं.१००२२०२१-कोल-शांताबाई आगळे (खून)

Web Title: Pieces made by the brutal murder of an old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.