पिंपळगाव बुद्रुकमध्ये चक्क पोलिसांनाच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:50+5:302021-01-16T04:29:50+5:30
अधिक माहिती अशी, आज ग्रामपंचायत निवडणुका दरम्यान पिंपळगाव (ता. कागल) येथे जाहीर प्रचार संपला असताना यशवंत सूर्यवंशी व केशव ...
अधिक माहिती अशी, आज ग्रामपंचायत निवडणुका दरम्यान पिंपळगाव (ता. कागल) येथे जाहीर प्रचार संपला असताना यशवंत सूर्यवंशी व केशव सूर्यवंशी हे दोघे जाहीर प्रचार करीत होते. मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर हे दोघे मतदानासाठी येणाऱ्यांना डमी मतदान यंत्र घेऊन चिन्हे सांगत होते. दरम्यानच्या काळामध्ये मुरगूड पोलीस ठाण्यामधील नाईक आनंदा रामा कुंभार हे सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्यासोबत पेट्रोलिंगला गेले होते. त्यांना हा प्रकार आढळून आल्यानंतर त्यांनी याला प्रतिबंध केला.
दरम्यान, खाडे यांनी आता आपल्याला प्रचार करता येणार नाही असे सांगून केशव सूर्यवंशी यांना कुंभार पोलिसांना ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार कुंभार यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी केशव यांनी पोलीस कुंभार यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी लगेच यशवंत सूर्यवंशी पुढे आला आणि कुंभार पोलिसांच्या कानशिलात लगावली. तसेच जोरदार धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिल्याने वरील दोघांविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
बनावट नोटांची ही चर्चाच
दरम्यान, याच गावात गुरुवारी रात्री उशिरा मतदारांना काहींनी दोन हजारांच्या नोटा वाटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत काहींनी रात्रीच मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये फोन करून माहिती दिली होती. पण, ज्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला त्यांना शिव्या देऊन हाकलून लावल्याने हे प्रकरण मिटले; पण या घटनेची चर्चा दिवसभर सुरू होती, तर त्या नोटांचे फोटोही सोशल मीडियावर फिरत होते.