कोल्हापुरातील खगोल प्रेमींनी अनुभवला पिंक सुपरमून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 06:28 PM2021-04-28T18:28:19+5:302021-04-28T18:31:04+5:30
Supermoon : चैत्र पौर्णिमेला या वर्षातील पहिला विलोभनीय "पिंक सुपरमून" कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी मंगळवारी रात्री अनुभवला.
कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेला या वर्षातील पहिला विलोभनीय "पिंक सुपरमून" कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी मंगळवारी रात्री अनुभवला.
पौर्णमेचा चंद्र मंगळवारी सायंकाळी सात वाजून १५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवला. नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा हा चंद्र आकाराने १० टक्के जादा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसत होता. सुरुवातीला अवकाश काहीसे ढगाळ होते, त्यामुळे सायंकाळी ढगांच्या गर्दीत अत्यंत थोड्या काळासाठी चंद्र पाहता आला. परंतु त्यानंतर पहाटे पर्यंत चंद्राच्या विविध छटा खगोल प्रेमींनी अनुभवता आल्या.
मंगळवारी भारतातील नागरिकांनी ह्या वर्षाचा पहिला गुलाबी चंद्र किंवा सुपरमून पाहिला. पृथ्वीचा सर्वात जवळ किंवा चंद्र त्याच्या परिघाच्या ९० टक्क्याचा आत असल्याने या नवीन वर्षातील पौर्णिमेचा हा ह्यसुपरमूनह्ण असे संबोधला गेला. हा चंद्र आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी दिसला. पृथ्वी व चंद्र या मधील आजचे अंतर ३ लाख ५७ हजार किलोमीटर होते. ज्यांनी २६ आणि २७ एप्रिल रोजी या सुपर मूनचे दर्शन घेता आले नाही, त्यांना आज, दिनांक २८ रोजी सायंकाळी याचा अनुभव जरूर घेता येणार आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून खगोल अभ्यासकानी आपापल्या घरी, मोकळ्या जागेत, टेरेसवर तसेच चंबुखडी परिसरात या चंद्र दर्शनाचा अनुभव घेतला. अवकाश संशोधन केंद्र,पन्हाळा आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर, सोळांकुर येथील प्रा. अविराज जत्राटकर, खगोल अभयक किरण गवळी, डॉ. राजेंद्र भस्मे, वैभव राऊत, यश आंबोळे, अभिषेक मिठारी इत्यादींसह अनेकांनी या सुपर पिंक मूनची निरीक्षणे केली.
मे महिन्यातही संधी
मे महिन्यात २५, २६ आणि २७ रोजी रात्री कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी पुढील सुपरमूनचे दर्शन एक महिन्यानंतर होणार आहे.
पिंक सुपरमून
उत्तर अमेरिकेत वसंत ऋतू मध्ये रानटी फुले किंवा जो मॉस फॉल्क्स (फ्लोक्स सुबुलाटा) फुले फुलतात, ते गुलाबी रंगाची असतात आणि ती संपूर्ण जमीन आच्छादून टाकतात. ही चमकदार रंगाची फुले बहुतेकदा एप्रिलच्या पूर्ण चंद्राच्या वेळी फुलतात, म्हणून त्यास गुलाबी चंद्र असे म्हणतात. खगोल वैज्ञानिक रिचर्ड नोल यांनी १९७९ मध्ये सुपरमून या शब्दाची रचना केली.
मंगळवारी दिसलेले सुपरमून अधिक तेजस्वी भासले. याशिवाय पुढील महिन्यात दिसणारे सुपर मुन आज रात्रीच्या दृश्यापेक्षा पृथ्वीच्या अगदी जवळ असेल.
- डॉ. राजीव व्हटकर,
समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र,पन्हाळा आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.