शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपावरील पाइपच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:53+5:302021-04-20T04:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी संघाच्या गैरकारभाराचे रोज एक प्रकरण पुढे येत आहे. संघाच्या कणेरी (ता. करवीर) येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी संघाच्या गैरकारभाराचे रोज एक प्रकरण पुढे येत आहे. संघाच्या कणेरी (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपावरील सिमेंट पाइपच एका जबाबदार पदाधिकाऱ्याने गायब केल्याने खळबळ उडाली आहे. संचालक मंडळातील गदारोळानंतर संबंधिताने कबुली दिल्याचे समजते.
संघाच्या कणेरी पेट्रोल पंपाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. पंपाच्या खालून कॅनॉल गेल्याने त्यासाठी सिमेंटच्या मोठ्या पाइपांची गरज होती. त्यासाठी संघ व्यवस्थापनाने सात हजार रुपये प्रतिनग दराने पाइप खरेदी केले. यामध्ये सात पाइप जादा होते, काम संपल्यानंतर हे पाइप परत घेण्यास संबंधित कंपनीने नकार दिल्याने गेली चार महिने पाइप तिथेच पडून होते. त्यातील चार पाइपची विक्री केली. मात्र, तीन पाइप संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने आपल्या गावाकडे नेल्याचे प्रकरण उघडकीस आले. संघामध्ये याबाबत कुजबुज सुरू होती, त्याचे पडसाद संचालक मंडळाच्या सभेत उमटले. यावरून गदारोळ सुरू झाल्यानंतर संबंधिताने आपणच पाइप नेल्याचे कबूल केल्याचे समजते.
कोट-
तीन पाइप फुटके असल्याने ते महामार्गावर पडून होले. त्याची विक्री केलेली आहे, त्यामध्ये गैरव्यवहार झालेला नाही.
- जी. डी. पाटील (अध्यक्ष, शेतकरी संघ)