पिराची वाडीकरांना मिळाले पशुधन वाढीला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:54+5:302021-04-12T04:22:54+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : पिराची वाडी गावाला हमालांचे गाव म्हणून असणारी ओळख पुसण्यासाठी सरपंच सुभाष भोसले यांनी या डोंगर-उतारावर ...
दत्ता पाटील
म्हाकवे : पिराची वाडी गावाला हमालांचे गाव म्हणून असणारी ओळख पुसण्यासाठी सरपंच सुभाष भोसले यांनी या डोंगर-उतारावर पाणी योजना साकारली. त्यामुळे येथील जमीन कोरडवाहूची बागायती झाली. आता त्यापुढे पाऊल टाकत भोसले यांनी कृषी विभागाच्या मदतीने गावात पशुधन वाढविण्याचे काम हाती घेतले आहे.
कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून येथील तब्बल ४६ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे खरेदी आणि त्यांच्या खुराकासाठी १२ लाख २६ हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. याबाबत सरपंच भोसले यांच्याप्रती शेतकऱ्यांतून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
चार वर्षांपूर्वी येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने पशुसंवर्धनाचा विषय दूरचाच. ही वानवा दूर करण्यासाठी भोसले यांनी आपली जमीन, घरातील महिलांचे दागिने बँकेकडे गहाण ठेवून दुधगंगा नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना केली. यामुळे गावातील जमीन ओलिताखाली येऊन ओल्या चाऱ्याची उपलब्धता झाली; परंतु दुधाळ जनावरांचे दर गगनाला भिडले आहेत. जनावरे खरेदी करणे अशक्य आहे. याचा विचार करून भोसले यांनी वरील योजनेचा आधार घेऊन येथील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले.
दरम्यान, प्रति जनावर खरेदी व त्याच्या खुराकासाठी २० हजारांच्या अनुदानाची तरतूद शासनाकडून केली जाते.
सुभाष यांनी गावचे नंदनवन केलेच. त्याबरोबरच गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवायला मोठा हातभार लावला. त्यांची दूरदृष्टी आम्हाला आमच्या पायावर उभे करायला उपयुक्त ठरली आहे.
-विलास भोसले
शेतकरी, पिराची वाडी
गावकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाणी योजना पूर्ण केली, तर आता गावात पशुधन वाढावे, दुग्ध व्यवसायातून शेतकरी कुटुंबांना आर्थिक हातभार लागतो, या उद्देशाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा पाठपुरावा केला.
सुभाष भोसले,
सरपंच, पिराची वाडी.