जिल्ह्यात पीरपंजांचे विसर्जन
By Admin | Published: November 5, 2014 12:13 AM2014-11-05T00:13:13+5:302014-11-05T00:22:55+5:30
अबिराची उधळण : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा मोहरम
कोल्हापूर : इमामे हसन व हुसैन यांची स्मृती जागविणारा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा मोहरम जिल्ह्यात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज, मंगळवारी ढोल-ताशांच्या निनादात, अबिराची उधळण करीत गावागावांतील पीर पंजांचे विसर्जन करण्यात आले.
गडहिंग्लज : शहर व तालुक्यात मकानदारवाडा, खलिफ मोहल्ला, चावडी व मुल्ला मस्जिद याठिकाणी नालसाब व पंजे बसविण्यात आले होते. काल, सोमवारी खतलरात्री खाई फोडण्याचा विधी पार पडला. रात्री उशिरापर्यंत नालसाब खेळणे व पंजे भेटीचा कार्यक्रम झाला. आज, मंगळवारी सकाळी येथील नेहरू चौकात ताबूत भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय ऐक्य, सद्भावना, शांती व समृद्धीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
दुपारी अबिराची उधळण व ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक सजविलेल्या ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी उशिरा हिरण्यकेशी नदीघाटावर ताबुतांचे विसर्जन करण्यात आले.
कुरुंदवाड : ढोल-ताशांच्या निनादात, अबिराची उधळण करीत कुरुंदवाडसह परिसरातील पीर पंजांचे उत्साहात
विसर्जन करण्यात आले. यामुळे शहरातील सर्वच गल्ली, रस्ते अबिरमय झाले
आहेत.
कुरुंदवाडसह परिसरात गेले दहा दिवस मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वच मशिदी विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाल्या होत्या. प्रतिष्ठापनेपासून सर्व पीर पंजांची विधिवत पूजाअर्चा व विविध कार्यक्रमांनी मोहरम साजरा करण्यात आला. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील सर्व पीरपंजे प्रत्येक घरोघरी पायावर पाणी घेत, ढोल-ताशांच्या निनादात अबिराची उधळण करीत शहरातील प्रमुख मार्गांवरून विसर्जन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.(प्रतिनिधी)