पिराची ३७४ देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित
By Admin | Published: June 17, 2015 12:19 AM2015-06-17T00:19:14+5:302015-06-17T00:38:00+5:30
शासनाचा निर्णय : खंड भरण्यासाठी औरंगाबादला हेलपाटे
विश्वास पाटील - कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील कोल्हापूर जिल्ह्यातील ३७४ पिराची देवस्थाने औरंगाबादच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे हस्तांतरित झाली आहेत. त्यामुळे या देवस्थानांच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना खंड भरण्यासाठी आता औरंगाबादला हेलपाटे मारावे लागणार आहेत. अशीच स्थिती राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत देवस्थान समितीचे कार्यक्षेत्र आहे. तीन हजार ६४ मंदिरांचे व्यवस्थापन ही समिती करते. या मंदिरांच्या मालकीची १७ ते १८ हजार एकर जमीन आहे. तिच्या मालकी हक्काबाबतही प्रचंड गोंधळ आहे. त्याचे सातबारे नीट नाहीत. ही जमीन कोण कसते, त्याची माहितीही समितीला नाही. मुस्लिम धर्मीयांच्या जमिनीबाबत देवस्थान समिती व वक्फ मंडळ अशा दोन्ही पातळ्यांवर गोंधळात गोंधळ आहे. देवस्थानकडे कोल्हापूर जिल्ह्यांतील ३७४ देवस्थानची नोंद आहे. त्यांमध्ये पीर, पीर दर्गा, हजरत मुस्लिम, हजरत, हुसेन बादशहा, फकीर मशीद, अशी ही पिराची देवस्थाने आहेत. त्यांचे दर्गे व शेतजमिनी आहेत. पूर्वी या दोन्ही देवस्थानांचे व्यवस्थापन देवस्थान समिती पाहत असे. या दर्ग्यांचा काही उत्सव असेल तर रंगरंगोटी व चालू दुरुस्तीसाठी काही रक्कम देवस्थान समिती देत असे; परंतु शासनातर्फे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. वाय. पटेल यांनी ३१ जुलै २००६ रोजी गॅझेट करून ही देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करावीत, असे आदेश काढले; परंतु प्रत्यक्षात मंडळाने तसे देवस्थान समितीला कळविले नाही. देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनाच असा आदेश झाला असल्याचे कुठेतरी समजल्यावर त्यांनी या जमिनींशी संबंधित कागदपत्रे मंडळाकडे सुपूर्द केली आहेत. प्रत्यक्षात या नक्की किती जमिनी आहेत, त्या आता कोण कसत आहे, त्यांचा वार्षिक खंड किती जमा होतो, याची कोणतीही माहिती देवस्थानकडे उपलब्ध नाही. ती वक्फ मंडळाकडेही उपलब्ध नसल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. हा आदेश पाहून देवस्थान समितीने जिल्हाधिकाऱ्यांना ही पिराची देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केल्याचे कळविले आहे.
ही जमीन कसणारे शेतकरी आतापर्यंत गावातच तलाठ्याकडे, काही तहसीलदार कार्यालयात, तर काही देवस्थान समितीकडे वार्षिक खंड आणून भरत असत; परंतु आता समितीने हा खंड भरून घेणे बंद केले आहे. पिराची देवस्थाने औरंगाबादला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे खंड भरा, असे देवस्थानचे म्हणणे आहे. रोज पाच-सहा शेतकरी देवस्थानकडे हेलपाटे मारीत आहेत. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘देवस्थान’ किंवा ‘पिराची जमीन’ असा शेरा असतो. वर्षाला खंड भरल्यामुळे जमीन कसत असल्याबद्दलचा महत्त्वाचा कायदेशीर पुरावा उपलब्ध होतो; परंतु आता त्यासाठी त्यांना औरंगाबादला जावे लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात खंड भरून घेण्याची वक्फ मंडळाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी औरंगाबादला येऊनच खंड भरणे बंधनकारक आहे.
- बेग इफ्तिकार उल्ला, प्रतिनिधी, राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
आमच्याकडे गावातील पीर देवस्थानची जमीन आहे. त्याचा खंड एक हजार रुपये प्रतिवर्षी भरत होतो; परंतु आता तो भरण्यासाठी दोन हजार रुपये खर्चून औरंगाबादला जावे लागणार आहे. त्यापेक्षा मंडळानेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर अथवा विशिष्ट बँकेत खंड भरून घेण्याची व्यवस्था केल्यास आमचा त्रास वाचू शकेल.
- मनोज माने, खंडकरी शेतकरी, भादोले
खंड असतो किती...
पूर्वी हा खंड एकरी २००, १५० व १२५ रुपये असा जमिनीच्या प्रतीनुसार होता. पुढे २००९-१० पासून समितीने ऊसपीक असलेल्या जमिनीसाठी एकरी १५०० व जिरायत शेतीसाठी ३०० रुपये केला आहे. देवस्थान समितीला वर्षाला ३० लाख रुपयांचे उत्पन्न खंडातून मिळते, अशी माहिती देवस्थान समितीचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली.