पिरजादे बिनविरोध तर शेळके, छाया पोवार चिठ्ठीद्वारे विजयी
By Admin | Published: April 21, 2016 12:51 AM2016-04-21T00:51:31+5:302016-04-21T00:51:31+5:30
सभापती निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा; ‘ताराराणी’ला एक जागा
कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. बुधवारी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला दोन समित्यांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका समितीवर सभापती करता आले. ताराराणी आघाडीला एका समितीचे तेही चिठ्ठीद्वारे सभापतिपद मिळाले. शिवसेनेच्या नियाज खान यांनी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांनी माघार घेतली. शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांनी निवडणूक लढविली, परंतु त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही.
गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदी प्रतीक्षा धीरज पाटील, शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती सभापतिपदी अफजल कुतुबुद्दीन पिरजादे, राजारामपुरी प्रभाग समिती सभापतिपदी छाया उमेश पोवार व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह भगवानराव शेळके यांची निवड झाली. जिल्हाधिकारी अमित सैनी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
गांधी मैदान प्रभाग समितीसाठी प्रतीक्षा पाटील (काँग्रेस) यांना १३, तर संतोष गायकवाड (भाजप) यांना ६ मते मिळाली. शिवाजी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी अफजल पिरजादे (राष्ट्रवादी) व नियाज खान (शिवसेना) यांचे अर्ज दाखल होते, परंतु नियाज खान यांनी माघार घेतली. त्यामुळे पिरजादेंची बिनविरोध निवड झाली. बागल मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी छाया पोवार (काँग्रेस) व राहुल चव्हाण (शिवसेना) यांच्यात निवडणूक झाली. शिवसेनेने भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा दिला होता, तर पूजा नाईकनवरे (ताराराणी) व वहिदा सौदागर (राष्ट्रवादी) या गैरहजर होत्या. त्यामुळे दोघांना ९-९ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय घेतला. त्यात छाया पोवार विजयी झाल्या. ताराराणी मार्केट प्रभाग सभापतिपदासाठी माधुरी लाड व राजसिंह शेळके (ताराराणी) यांच्यात लढत झाली. दोघांना समान १०-१० मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकली, त्यात शेळके नशीबवान ठरले.
पूजा नाईकनवरे यांची अनुपस्थिती
पूजा नाईकनवरे या ताराराणी आघाडीच्या नगरसेविका आहेत. शिवसेनेच्या राहुल चव्हाण यांना भाजप- ताराराणी आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे त्या नाराज झाल्या. निवडणुकीत राहुल चव्हाण यांनी प्रकाश नाईकनवरे यांचा पराभव केला. त्याचा राग पूजा नाईकनवरे यांनी बुधवारी सभेस अनुपस्थित राहून काढला. राजकारणातून नाईकनवरे यांनी विरोध केल्याने राहुल चव्हाण यांचा प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.