कोल्हापुरात पिस्तुल तस्कर मनीष नागोरीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 07:27 AM2019-04-07T07:27:59+5:302019-04-07T07:28:23+5:30
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर गावठी पिस्तुल पुरविणारा मोस्ट वॉन्टेड तडीपार आरोपी मनीष नागोरी याला अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर गावठी पिस्तुल पुरविणारा मोस्ट वॉन्टेड तडीपार आरोपी मनीष नागोरी याला अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरातील हॉटेल स्कायलाक येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मनीष नागोरीला पोलिसांनी बेड्या घातल्या.
कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कलम 142 नुसार मनीष नागोरीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केली. मनीष नागोरी हा कारागृहातून सुट्टीवर बाहेर गेल्यानंतर फरार झाला होता. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी चंदगड येथून चार पिस्तुलासह काडतुसे जप्त करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मनीष नागोरी यानेच त्यांना हा शस्त्रसाठा पुरविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी यड्राव (ता. शिरोळ) येथील आहे. त्याचे वडील कापडाचा लहानसा व्यवसाय करीत होते. मनीषनेही इचलकरंजीत मोबाइल विक्रीचे दुकान थाटले. पण झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अवैध व्यावसायिकांशी त्याची सलगी वाढल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील काहींचा संपर्कात होता. हाच मनीषचा प्रवास अनेकांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरला. सुरुवातीला त्याच्या गुन्हेगारीला खाकी वर्दीतील काही जण पाठबळ देत होते,याच जोरावर त्याने परराज्यातून पिस्तुल आणून विकण्याचा छुपा व्यवसाय सुरू केला होता.