फिरस्त्याच्या खुनातील रिव्हॉल्व्हर गायब
By Admin | Published: January 14, 2016 12:50 AM2016-01-14T00:50:13+5:302016-01-14T00:50:13+5:30
आरोपीला आज न्यायालयात करणार हजर
कोल्हापूर : शिवाजी पेठ निवृत्ती चौक परिसरातील वृद्ध फिरस्त्याच्या खुनातील संशयित आरोपीस ताब्यात घेऊन सात दिवस होऊन अद्यापही रिव्हॉल्व्हरचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. तपास लांबणीवर जात असल्याने पोलिसांनी संशयित आरोपीला बुधवारी अटक दाखविली. हसन गौस मुल्लाणी (वय २९, रा. सदर बाजार) असे त्याचे नाव आहे. त्याची रात्री उशिरा सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलीस रिमांडची मागणी केली जाणार आह, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
बाबूजमाल तालीम-निवृत्ती चौक रस्त्यावर दि. ७ रोजी नारायण देसाई हे मृतावस्थेत जुना राजवाडा पोलिसांना मिळाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.सीपीआरच्या शवविच्छेदनामध्ये त्यांच्या डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याने मृत्यू झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांचा खून कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला, हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले. लक्ष्मीपूरी पोलिसांनी ४८ तासांच्या आत दि. ८ रोजी संशयित हसन मुल्लाणी याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड हे त्याच्याकडे सात दिवस कसून चौकशी करीत होते. परंतू त्याने शेवटपर्यंत गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्ह कोठे ठेवले, ते कोठून आणले याची माहिती दिली नाही. त्याची मानसिक अवस्था व्यवस्थित नसल्याने तो योग्य माहिती देत नाही. त्यामुळे त्याला बुधवारी अटक दाखविली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलीस रिमांडची मागणी केली जाणार आहे. त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)