काँग्रेसच्या नामधारी अध्यक्षांना घरी बसवा

By admin | Published: April 16, 2017 12:54 AM2017-04-16T00:54:05+5:302017-04-16T00:54:05+5:30

सुरेश हाळवणकर यांची टीका : घोटवडेत महाआघाडीची प्रचार सभा; कारखाना कर्जमुक्त करू : के. पी. पाटील

Place the nominated president of the Congress in the house | काँग्रेसच्या नामधारी अध्यक्षांना घरी बसवा

काँग्रेसच्या नामधारी अध्यक्षांना घरी बसवा

Next

भोगावती : कॉँग्रेसला संपूर्ण देशातून हद्दपार केले, आता शेतात उगवणाऱ्या ‘कॉँग्रेस’लाही शेतकरी कंटाळला आहे. अशा कॉँग्रेसच्या नामधारी अध्यक्षांना बसायला जागा राहिली नसल्यानेच त्यांना ‘भोगावती’ पाहिजे आहे. कारखान्याचा राजकीय अड्डा करू पाहणाऱ्या अध्यक्षांना घरी बसवा, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कै. दादासाहेब पाटील-कौलवकर महाआघाडीचा प्रचार प्रारंभ शनिवारी घोटवडे (ता. राधानगरी) येथे झाला. त्यावेळी हाळवणकर यांनी कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.
कॉँग्रेसच्या काळात कारखान्यावर ३२ कोटींचे कर्ज होते, त्यामुळे या मंडळींनी पारदर्शकतेच्या गप्पा मारू नयेत, असा टोला हाणत माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘भोगावती’ला सहवीज व इथेनॉल प्रकल्प राबविल्याशिवाय पर्याय नाही. सभासदाभिमुख कारभाराच्या बळावर येत्या वर्षभरात कारखाना कर्जमुक्त करू. धैर्यशील पाटील यांचा कारभार उत्कृष्ट असून, खऱ्या अर्थाने विरोधकांच्या काळातच कारखाना डबघाईला आला.
त्यांच्या काळातील कारभार तपासावा, असे सांगत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत शपथा घेऊन हुकूमशाहीचे राजकारण विरोधकांकडून सुरू आहे. धैर्यशील पाटील म्हणाले, आमच्या काळात साखर उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा राहूनही पारदर्शक कारभार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिला. संपतराव पवार, अशोकराव पवार, जालंदर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पांडुरंग डोंगळे यांनी स्वागत केले. बाबासाहेब देवकर यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, विठ्ठलराव खोराटे, भगवान काटे, नामदेवराव भोईटे, साताप्पा कांबळे, आदी उपस्थित होते.



नवीन कर्मचाऱ्यांना धक्का नाही
कारखान्यात मध्यंतरी भरती केलेल्या ५८० कर्मचाऱ्यांना धक्का लागणार नाही. विविध योजना राबविण्यासाठी सरकार कोट्यवधीचे कर्ज काढते, मग या कर्मचाऱ्यांचा संसार फुलविण्यासाठी कर्ज काढले म्हणून बिघडले कोठे?; पण कोणी चुकीचा कारभार केला तर प्रशासक नेमण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा हाळवणकर यांनी दिला.

‘ए. वाय.’ माझे चेले!
‘भोगावती’तील युती ‘बिद्री’तही कायम राहावी, असे संकेत देत के. पी. पाटील म्हणाले, ए. वाय. पाटील हे कच्च्या गुरूचे नव्हे, तर माझे चेले आहेत. ते कोठेही जाणार नाहीत. कारखाना वाचविण्यासाठी महाआघाडीच्या मागे हिमालयासारखे राहतील.

गर्दीचा उच्चांक!
राष्ट्रवादीतील बंडाळीचे पडसाद शनिवारी महाआघाडीच्या प्रचार प्रारंभावर होईल, असे वाटत होते; पण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पुरुषांसह महिलांची संख्याही लक्षणीय होती.

राष्ट्रवादीत गद्दारांना स्थान : हंबीरराव पाटील
महाआघाडीचे पॅनेल बांधताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना करवीर तालुक्यातून एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. उलट ज्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली, त्यांचा सन्मान केला जातो, हे दुर्दैव असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी घोटवडे (ता. राधानगरी) येथे झालेल्या महाआघाडीच्या प्रचार प्रारंभातच केली.

भाजपमुळेच ‘भोगावती’ परिसर ओलिताखाली
भाजप सरकारने धामणी प्रकल्पासाठी ७५१ कोटी, तर राधानगरी व करवीर तालुक्यांतील विविध कामांसाठी २५७ कोटी निधी दिला आहे. यामुळे भोगावती कार्यक्षेत्रातील १० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.


महाआघाडीतून उमेदवारी नाकारल्याने हंबीरराव पाटील यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक नामदेव पाटील, सुनील कारंडे, आदी मंडळी नाराज आहेत. त्यांनी प्रचार सभेतच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अक्षरश: वाभाडे काढले.
प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी काय साधले असा सवाल करीत राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे; पण महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे हंबीरराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: Place the nominated president of the Congress in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.