अंबाबाई दर्शन मंडपासाठी जागेची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:29 PM2019-07-19T12:29:12+5:302019-07-19T12:33:18+5:30
श्री अंबाबाई मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी केली. या जागेबाबत शिंदे कुटुंबीयांशी बोलणी करण्यात येणार आहेत. त्यांचा होकार आला तर मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा विनासायास पार पडेल.
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिराच्या नियोजित दर्शन मंडपाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी केली. या जागेबाबत शिंदे कुटुंबीयांशी बोलणी करण्यात येणार आहेत. त्यांचा होकार आला तर मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा विनासायास पार पडेल.
अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी मनपाकडे सात कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ गेटसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यात येणार होता. त्याचे बजेट साडेचार कोटी होते. मात्र, येथे नवी इमारत बांधणे ‘पुरातत्त्व’च्या नियमांविरुद्ध, मंदिर स्थापत्यशैलीला, सौंदर्य व व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही बाधक असल्याने हेरिटेज समिती, आर्किटेक्टस असो.ने विरोध केला. कोल्हापूरकरांनीही त्यावर आक्षेप नोंदविला आहे. हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी फरासखान्याचा पर्याय मांडला होता.
गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर माधवी गवंडी, ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास, देवस्थानचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, प्रकाश गवंडी यांनी फरासखान्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याला, प्रांत कार्यालयाला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी करून जागा निश्चित केली. आता या जागेसंदर्भात शिंदे कुटुंबीयांशी चर्चा करण्यात येईल. त्यांचा होकार आला तर आराखड्यात फेरबदल करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.
मनकर्णिका कुंड खुला करणार
अंबाबाईच्या स्नानाचे पाणी जेथे जाते, त्या महालक्ष्मी उद्यानाखालील मनकर्णिका कुंड पुन्हा खुला करण्याचा ‘देवस्थान’चा मानस आहे. त्यासाठी त्यांनी ही जागा पुन्हा ‘देवस्थान’कडे हस्तांतरित करावी, अशी मागणी केली आहे. त्यास आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. महापालिकेच्या पुढीस सभेत हा विषय चर्चेला आणला जाईल. मनकर्णिका कुंड खुले झाल्यास जमिनीखाली दडलेली पुरातन, पवित्र वास्तू पुन्हा प्रकाशात येईल.
योग्य मोबदला देण्याचीही तयारी
वापराविना पडून असलेल्या या इमारतीत राजाराम महाराजांच्या काळात प्रेस चालविले जायचे. पुढे ती जागा शिंदे सरकार यांना विकली. आता ही इमारत मिळाल्यास या साडेसहा हजार चौरस फूट जागेत दर्शन मंडप उभा राहू शकतो. त्यासाठी देवस्थान समिती, मनपा योग्य तो मोबदला द्यायला तयार आहे. शिंदे सरकार देवीच्या कार्यासाठी नकार देणार नाहीत, अशी अपेक्षा असून त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘देवस्थान’चे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.