घरफाळा घोटाळ्यातील फिर्यादीच बनला आरोपी; कररचनेत बदल करून केले कोल्हापूर महापालिकेचे आर्थिक नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:51 AM2023-02-24T11:51:34+5:302023-02-24T11:51:57+5:30
याप्रकरणात चौघांना अटक झाली असून एक जण मयत झाला आहे
कोल्हापूर : शहरातील सहा इमारतींच्या कररचनेत बदल करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन कर निर्धारक संजय शिवाजीराव भोसले (वय ५३, रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) याला बुधवारी (दि. २२) रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.
तिसरे सहदिवाणी न्यायाधीश एम. एम. पळसापुरे यांच्यासमोर गुरुवारी (दि. २३) हजर केले असता, न्यायाधीशांनी भोसले याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. विशेष म्हणजे अटकेतील संशयित भोसले यानेच १३ जून २०२० मध्ये घरफाळा घोटाळ्याबद्दल पोलिसात फिर्याद दिली होती. भोसलेच्या अटकेने फिर्यादीच आरोपी बनला आहे.
शहरातील राजारामपुरी आणि शाहूपुरी येथील सहा इमारतींच्या घरफाळा रचनेत बदल करून करनिर्धारक आणि त्यांच्या कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी संगनमताने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी तत्कालीन आयुक्तांकडे केल्या होत्या.
त्यानुसार तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्यावेळचे करनिर्धारक संजय भोसले यास संबंधित तक्रारींची चौकशी करून पोलिसात तक्रार देण्याची सूचना दिली होती. महापालिकेचे सुमारे तीन कोटी ३७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची फिर्याद भोसले याने जून २०२० मध्ये नोंदवली. त्यानुसार कर निर्धारक कार्यालयातील कर्मचारी दिवाकर कारंडे, विजय खातू, नितीन नंदवाळकर आणि अनिरुध्द शेटे यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याच्या अधिक तपासात पोलिसांना फिर्यादी संजय भोसले याचाही सहभाग आढळला. त्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा महापालिकेकडून सुधारित अहवाल मागवला. कर निर्धारक सुधाकर चल्लावाड समितीच्या अहवालातही भोसले दोषी आढळत असल्याने पोलिसांनी फिर्यादीवरच गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात आणि सरकारी वकील एस. ए. म्हामुलकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी संशयितास पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायाधीशांकडे केली.
तर संशयिताचे वकील प्रकाश मोरे यांनी पोलिसांचा रखडलेला तपास आणि संशयिताच्या प्रकृतीचे कारण सांगत पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. अखेर न्यायाधीशांनी भोसले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, ॲड. मोरे यांनी जामिनाचा अर्ज दाखल केला. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत पोलिसांचे म्हणणे घेतल्यानंतर निर्णय होईल, असे ॲड. मोरे यांनी सांगितले.
४६ लाख ३० हजारांचे नुकसान
पहिला गुन्हा ३ कोटी ३७ लाख रुपयांच्या नुकसानीचा दाखल झाला होता. त्यानंतर सुधारित अहवालानुसार एक कोटी ८० लाखांपर्यंत नुकसानीची रक्कम आली. गुरुवारी झालेल्या सुनावणीत संशयित भोसले याने ४६ लाख ३० हजार २३ रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीच आरोपी बनल्याने आश्चर्य
भोसले याने घरफाळा घोटाळ्याची चौकशी करताना त्यातील स्वत:चा सहभाग दडवून अन्य तिघांच्या विरोधात तक्रार दिली. पण त्याने काही विशिष्ट मिळकतधारकांच्या करात वाढ केली नाही, त्यामुळे त्याचाही गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
चौघांना अटक, एक मयत
या गुन्ह्यातील संशयित अनिरुद्ध शेटे याचा मृत्यू झाला आहे, तर विजय खातू, नितीन नंदवाळकर आणि दिवाकर कारंडे यांना यापूर्वीच अटक झाली आहे. आता चौथ्या संशयितास अटक झाली.
कर्मचाऱ्यांची गर्दी
संशयित भोसले सध्या महापालिकेतील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे समजताच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणि जिल्हा न्यायालयातही गर्दी केली होती.