शांततेसाठी ‘प्लॅन आॅफ अॅक्शन’ , नांगरे-पाटील : आंबेडकरी चळवळ व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची सलोखा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:47 AM2018-01-09T00:47:23+5:302018-01-09T00:47:28+5:30
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘प्लॅन आॅफ अॅक्शन’ बनविलेला आहे.
कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘प्लॅन आॅफ अॅक्शन’ बनविलेला आहे. यापुढे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, सलोखा राहावा, यासाठी आंबेडकरी चळवळ व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा कायम टिकून राहावा, अशा भावना व्यक्त केल्या. सबळ पुराव्यांद्वारे दंगलीतील आरोपींचे अटकसत्र सुरू आहे. कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला जाणार नाही, अशी माहिती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदला शहर व जिल्ह्यात हिंसक वळण लागले. अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. गंभीर मारहाणीचे प्रकार झाले. त्याअनुषंगाने पोलिसांनी दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत १३४ जणांना अटक केली आहे. अटकेच्या अनुषंगाने काही ठिकाणी तणाव निर्माण होत होते. या पार्श्वभूवीर पोलीस प्रशासनाने मुख्यालयात सोमवारी सकाळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व दुपारी हिंदुत्ववादी संघटनांची स्वतंत्ररित्या बैठक घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे काम आम्ही केले आहे. अनेक ठिकाणी आमच्या आवाक्याबाहेर जमाव गेला होता. बिंदू चौकात हतबलपणे आम्ही बसलो होतो. आता आमचे मिटले आहे. पोलिसांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी, पोलिसांनी आमचे दुष्मन होऊ नये, अशा भावना व्यक्त केल्या.
नांगरे-पाटील यांनी सामाजिक विण विस्कटलेली आहे. तिला दुरुस्त करण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे. निरपराध आहेत त्यांचेवर कारवाई होणार नाही; दोनशे कॅमेºयांचे सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती आहे. ज्यांच्या हातात काठ्या, दगड आहेत, जे तोडफोड करताना दिसतात त्यांचे पुराव्यांनिशी अटकसत्र सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकूण घेऊन त्या तपासणे ही आमची जबाबदारी आहे.
ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्या ज्येष्ठ नेत्यांनी कोणती भूमिका बजावलेली आहे, ती तपासली जाईल. लोकांना विश्वासात घेऊन पोलीस काम करीत आहेत. समाजामध्ये संवादाचे वातावरण व्हावे, ही भूमिका पोलीस प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, करवीचे सूरज गुरव, इचलकरंजीचे कृष्णात पिंगळे आदींसह विक्रम जरग, महेश जाधव, सुजित चव्हाण, बंडा साळुंखे, महेश उरसाल, शिवाजी जाधव, ओंकार जोशी, राजू पाटील, संभाजी नाईक, मिलिंद पाटील, रफिक कलावंत, अमर पाटील यांच्यासह आंबेडकर चळवळीचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सुभाष देसाई, अनिल कुरणे, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रुप अॅडमिनवर कारवाई
दोन दिवस शहरासह काही तालुक्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्याचा चांगला परिणाम झाला. सोशल मीडियावरील अफवांचे प्रमाण कमी झाले होते. ३ जानेवारीला घटना घडली. त्यावेळी सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरल्या. सायबर लॅबमध्ये अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. सोशल मीडियामध्ये काय चालले आहे, ते समजत आहे. अशा पद्धतीची जातीय तेढ, विषारी पोस्ट करत असेल तर त्या ग्रुपच्या अॅडमिनवर कारवाई केली जाईल.
शांतता समितीची पुनर्बांधणी
शहरासह जिल्ह्यात शांतता समित्या आहेत. ज्यांचा युवकांवर प्रभाव आहे. त्या व्यक्तींना समितीमध्ये घ्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार परिक्षेत्रामध्ये या समितींची पुनर्बांधणी केली जाईल. त्यासाठी संबंधित पोलीस अधीक्षकांना आदेश दिले असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
संक्रांतीला गावोगावी सलोखा भेट
येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती, त्यानंतर १४ एप्रिलला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यानंतर १७ एप्रिलला पुन्हा तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. ठिकठिकाणी सामाजिक विण विस्कटलेली आहे. जातीय सलोखाचे कार्यक्रम आपण संक्रांती (दि.१४) ला तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमापासून करतोय. गावा-गावांत, वाड्या-वस्त्या व दलित वस्तीमध्ये प्रशासन जाऊन दोन्ही बाजूंच्या युवकांच्यात प्रबोधन करणार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीने होतो, याचा समुपदेशनाचा संवाद साधला जाईल.
कोरेगाव भीमा दंगलीतील १२ जणांना अटक
कोरेगाव भीमा, सरसवाडी, कोंडापुरी या तिन्ही ठिकाणांहून बारा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे हाती आले आहेत. चाकणवरून आठ लोकांना, तर देहूवर काही लोकांना अटक केली असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
तडिपार कारवाई करणार
दंगलीमध्ये रेकॉर्डवरचे गुन्हेगार, अवैध व्यावसायिक सहभागी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कशी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्हे असतील तर त्यांना तडिपार करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.