माता मृत्यू, बाल मृत्यचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:28 PM2020-07-07T16:28:16+5:302020-07-07T16:32:02+5:30
कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर्व गर्भवती महिलांची नोंदणी पहिल्या तिमाहीमध्येच करा, असेही आदेश त्यांनी दिले.
कोल्हापूर : शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर्व गर्भवती महिलांची नोंदणी पहिल्या तिमाहीमध्येच करा, असेही आदेश त्यांनी दिले.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शुन्य ते १६ वर्ष वयोगटातील मुलांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त बाहय सत्रे आयोजित करावी. विशेषत: झोपडपट्टी भागामध्ये लसीकरण सत्रांचे बळकटीकरण करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सर्वेक्षणा दरम्यान डेंग्यू, चिकुनगुनिया आदी किटकजन्य आजाराबाबतही माहिती संकलित करावी. तसेच नागरिकांमध्ये आजाराविषयी जनजागृती करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
यावेळी उपायुक्त निखील मोरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबासो शिर्के, सीपीआर वैद्यकीय अधिक्षक डॉ.तेजस्वीनी सांगरुळकर, स्त्रीरोग तज्ञ संघटना अध्यक्ष डॉ.मंजुळा पिशवीकर, बालरोग संघटना अध्यक्ष डॉ.व्यंकटेश तरकसबंद, रोटरी स्वयंसेवी संघटनेचे डॉ. प्रकाश संघवी, एड्स नियंत्रण कार्यक्रम व्यवस्थापक दिपा शिपुरकर आदी उपस्थित होते.