कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर नेटके नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:32+5:302021-05-13T04:23:32+5:30
गडहिंग्लज : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षभरात १७०० हून अधिक रुग्ण बाधित झाले होते. परंतु, दुसऱ्या लाटेत अवघ्या ४२ ...
गडहिंग्लज : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षभरात १७०० हून अधिक रुग्ण बाधित झाले होते. परंतु, दुसऱ्या लाटेत अवघ्या ४२ दिवसांत गडहिंग्लज तालुक्यात १२२२ नागरिक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर नेटके नियोजन करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या.
गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रूपाली कांबळे होत्या.
मगर म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यात बाधित होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. तालुक्यातील महागाव, करंबळी, कडगाव, गिजवणे, भडगाव, हसूरचंपू, दुगूनवाडी या गावांत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य बाधित होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मृत्यूच्या दरातही तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी ग्राम दक्षता समित्या, नोडल अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून गृह व संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. खासगी डॉक्टर्सकडे तपासणीसाठी गेलेल्या नागरिकांचीदेखील त्यांच्याकडून माहिती संकलित करावी.
विजयराव पाटील म्हणाले, बाधितांच्या संपर्कातील तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात यावी. जि. प. वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने हेही दृकश्राव्य प्रणालीद्वारे या सभेत सहभागी झाले होते. ते म्हणाले, गडहिंग्लज पंचायत समितीकडील वित्त व लेखा विभागाचे काम कौतुकास्पद आहे.
विठ्ठल पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रंटलाईन कामगारांचा पंचायत समितीतर्फे सत्कार करावा.
श्रीया कोणकेरी म्हणाल्या, तालुक्यातील ज्या ठिकाणी शासकीय जागेत अतिक्रमणे झाली आहेत, त्याठिकाणी कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात यावे.
बैठकीस विद्याधर गुरबे, प्रकाश पाटील, जयश्री तेली, आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
-----------------------
*
स्प्रेइंग मशीनद्वारे औषध फवारणी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून तालुक्यातील सर्व गावांत औषध फवारणी केली जाते. फवारणीसाठी पंचायत समितीकडे ४२ स्प्रेइंग मशीन उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहितीही मगर यांनी दिली.
-----------------------
* फ्रंटलाईन वर्करना बेड राखीव ठेवा
ग्राम दक्षता समित्या, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी कोविड काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने प्राधान्याने घ्यावी. त्यांच्यासाठी कोविड सेंटरमध्ये राखीव बेड ठेवावेत, अशी मागणीही कोणकेरी यांनी केली.