(नियोजित) कोल्हापूरकर हरवतात रोज दोन मोबाइल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:40+5:302021-02-23T04:35:40+5:30

कोल्हापूर : शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणजे श्री अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी नागरिकांच्या खिशातून अलगद ...

(Planned) Kolhapurites lose two mobiles every day! | (नियोजित) कोल्हापूरकर हरवतात रोज दोन मोबाइल!

(नियोजित) कोल्हापूरकर हरवतात रोज दोन मोबाइल!

Next

कोल्हापूर : शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणजे श्री अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी नागरिकांच्या खिशातून अलगद मोबाइल फोन उचलणारे भुरटे चोर सक्रिय आहेत. अनेक ठिकाणी मोबाइल विसरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरातून तब्बल ६१० मोबाइल चोरीची अगर हरवल्याची पोलीस दप्तरी नोंद झाली आहे; पण त्यापैकी फक्त १३४ मोबाइल सापडले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकर दररोज किमान दोन मोबाइल हरवतात हे दिसून येते, तर जिल्ह्यात हजाराहून अधिक मोबाइल चोरीला गेले आहेत. ते सापडल्याचे प्रमाणही नगण्य आहे.

मोबाइल वापर हा सध्या माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनला आहे, आज भाजीवाल्यापासून बिझनेसमनपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो. अवघ्या एक हजार रुपयांपासून महागडे मोबाइल वापरणाऱ्यांची संख्याही कोल्हापुरात मोठी आहे. त्याप्रमाणात मोबाइल चोरटेही अलर्ट झाले. मोबाइल कधी शर्टच्या खिशातून अलगद उचलून चोरीला जातो याचा थांगपत्ताही लागत नाही; पण त्याची पोलीस दप्तरी तक्रार होते ‘गहाळ.’ चोरीला गेलेला मोबाइल पुन्हा मिळतच नाही, अशी नागरिकांची मानसिकता झाली असल्याने अनेक जण चोरीची, अगर गहाळ झाल्याची तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्या मोबाइलचा गैरवापर होऊ नये म्हणून काळजीने त्यातील सीमकार्ड तेवढे तातडीने ऑनलाइन बंद करतात.

४७२ मोबाइलचा शोध बाकी

गर्दीच्या ठिकाणी खिशातून मोबाइल अलगद उचलून लंपास केल्याच्या घटना वर्षभरात अनेक घडल्या, तशा मोबाइल हरवल्याच्याही घटना घडल्या. अशा पद्धतीने तब्बल ६१० मोबाइल चोरीला गेले, अगर हरवले आहेत. त्यापैकी पोलिसांनी काही घटनांतील कारवाईतून १३४ मोबाइल चोरट्यांकडून हस्तगत केले. म्हणजे ४७२ मोबाइलचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे चोरट्यांना शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

बाजारात, मंदिरात जाताय... मग मोबाइल सांभाळा!

२०२० या वर्षभरात शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, लक्ष्मीपुरी भाजीमंडई व शाहूपुरी बाजारपेठ, तसेच महाद्वार रोड, अंबाबाई मंदिर परिसरातून मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीला गेल्याच्या नोंदी पोलिसांत आहेत. त्यामुळे या भागात जाताना मोबाइल चोरापासून दक्ष राहणे आवश्यक आहे. याठिकाणी बहुतांशी लहान मुलेच मोबाइल चोरी करत असल्याचे दिसून आले आहे.

कोट...

किमती मोबाइल वापरताना तो चोरीला जाऊ नये, अगर तो हरवू नये याची प्रत्येकाने स्वत:च काळजी घ्यावी. चोरीला गेलेले मोबाइल शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करते; पण त्यासाठी बराच वेळ खर्चिक पडतो. मोबाइल चोर पकडताना तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे चोरट्याला शोधण्यासाठी बराच कालावधी लागतो.

-मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर

Web Title: (Planned) Kolhapurites lose two mobiles every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.