(नियोजन)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:27+5:302021-02-08T04:21:27+5:30

तानाजी पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातून घडलेल्या गैरकृत्यामुळे नातेवाईक दुरावले, कारागृहात शिक्षा भोगताना अधुनमधून काही नातेवाईक ...

(Planning) | (नियोजन)

(नियोजन)

Next

तानाजी पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हातून घडलेल्या गैरकृत्यामुळे नातेवाईक दुरावले, कारागृहात शिक्षा भोगताना अधुनमधून काही नातेवाईक भेटायचे, पण कोरोनाने भेटीगाठीचा तोही हक्क हिरावला, अशी अवस्था राज्याच्या कारागृहातील भिंतीआडचे विश्व जगणाऱ्या कैद्यांची झाली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या दहा महिन्यांपासून कारागृहातील कैदी हे नातेवाईकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीला मुकले. आजही या अवस्थेत बदल झालेला नाही. कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी प्रत्यक्ष नसल्या तरी, माणुसकीच्यादृष्टीने मोबाईल संभाषण अथवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून घडवल्या जातात.

अनवधानाने गैरकृत्य घडले अन्‌ कारागृहाचे विश्व जगण्याची वेळ आली. शिक्षा भोगतानाही त्याला रक्तातील नातेवाईकांना भेटण्याचा मूलभूत अधिकार असतो. पण कोरोनात जसा माणूस हा माणसापासून दुरावला, त्याला कारागृहही अपवाद कसे ठरेल? कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे २३५० कैदी शिक्षा भोगत आहेत. काही न्यायालयीन कैदी आहेत. कारागृहाची कैदी क्षमता जरी १८०० असली तरीही सांगली, सातारा येथील कारागृह ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने तेथील कैदी न्यायालयाच्या आदेशाने कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात आहेत.

कधी मोबाईल, तर कधी व्हिडीओ कॉलिंग

कोरोनाचा असर ओसरत असला तरीही दक्षता म्हणून कैद्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी अद्याप बंद आहेत. तरीही कैद्याच्या रक्तातील नातेवाईकाचा फोन नंबर घेऊन कारागृहातील कर्मचारी प्रथम फोन जोडून पलीकडे नातेवाईक आहेत का? याची खात्री करून लगेच फोन संबंधीत कैद्याकडे संभाषणासाठी दिले जातात. याच मोजक्याच वेळेतील संभाषणातून एकमेकाची विचारपूस करून स्नेह जपला जातो.

स्वेटर पोहोचले नाही, पण ब्लॅंकेट मिळाले

प्रत्यक्ष गाठीभेटीवेळी नातेवाईकाकडून कैद्यांना काही आपुलकीच्या वस्तू दिल्या जातात. थंडी वाढतेय, नातेवाईकांच्या भेटीच झाल्या नसल्याने स्वेटर पोहोचलेच नाही. पण कारागृह प्रशासनाने कैद्यांना ब्लँकेट देऊन मायेची ऊब दिली आहे.

कोट...

कोरोनाचा शिरकाव कारागृहात होऊ नये यासाठी दक्षता म्हणून नातेवाईकांच्या गाठीभेटी अद्याप बंदच आहेत. वस्तू आत आल्या तर त्याचा परिणाम प्रथम कर्मचाऱ्यांवर व नंतर कैद्यांवर होईल, त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे.

- चंद्रमणी इंदुरकर, अधीक्षक, कळंबा करागृह, कोल्हापूर

पाॅईंटर...

कळंबा कारागृहाची कैदी क्षमता : १८००

कैद्यांची संख्या : २३५० (पैकी २५० कोरोना पॅरोल रजेवर बाहेर)

Web Title: (Planning)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.