अमृत महोत्सव नियोजनावरुन तू तू-मै मै
By Admin | Published: March 22, 2017 01:10 AM2017-03-22T01:10:01+5:302017-03-22T01:10:01+5:30
जयसिंगपूर पालिका : विनाबजेट झाली विशेष सभा; १ एप्रिलपासून स्वच्छता अभियान
जयसिंगपूर : नगरपरिषदेचा अमृत महोत्सव साजरा करण्यावरुन पालिकेच्या विशेष सभेत ताराराणी आघाडी व राजर्षी शाहू विकास आघाडीत चांगलीच जुंपली. बजेटवरुन दोन्ही आघाडीतील सदस्यांनी एकमेकांना टार्गेट केले. सुमारे दिड तासाच्या चर्चेनंतर १ एप्रिलपासून शहर स्वच्छता मोहिमेने पालिकेचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षा डॉ.निता माने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. सभागृहासमोर जयसिंगपूर नगरपरिषदेचा अमृत महोत्सव साजरा करणे यासाठी आर्थिक नियोजन करणे यासह दोन विषय होते. अमृत महोत्सवाच्या विषयावरुन दोन्ही आघाड्याच्या नगरसेवकांनी मते मांडण्यास सुरुवात केली. नगरसेवक पराग पाटील म्हणाले, महोत्सव लोकाभिमुख व्हावा, मात्र बजेटमध्ये थोडी वाढ करण्याची सुचना केली. सर्जेराव पवार यांनी महोत्सव दिखावूपेक्षा टिकाऊ कसा करता येईल. महोत्सवाची सुरुवात शहर स्वच्छता मोहिमेने करावी जेणेकरुन प्रभागातील लोकांकडून स्वच्छतेबाबत संकल्पना मिळतील. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची त्रिसदस्य समिती नियुक्तीबाबत सुचना मांडली. शिवाजी कुंभार म्हणाले, महोत्सव कशापध्दतीने साजरा करायचा याची रुपरेषा आखली पाहिजे. प्रत्येक नगरसेवकांची मते आजमावून त्यानुसार वर्षभर त्याची अंमलबजावणी व्हावी. कमी बजेटमध्ये हा महोत्सव साजरा करता येईल का याचा विचार व्हावा. शैलेश चौगुले म्हणाले, या महोत्सवात तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट यांना समाविष्ट करावे. अशिक्षित नागरीकांसाठी दाखल्यांसाठी एक खिडकी योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. महोत्सवामध्ये शहर सुशोभिकरणावर भर द्यावा असे स्वरुपा पाटील-यड्रावकर यांनी सुचविले.
सोनाली मगदूम म्हणाल्या, लोकराजा राजर्षी शाहू यांनी शहराची निर्मिती केली. त्यामुळे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. विद्यार्थी, तरुण मंडळाच्या सहभागातून शहराचा आढावा घेणारे चित्रफित तयार करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक आसलम फरास म्हणाले, महोत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करुन निबंध स्पर्धाचे आयोजन करावे, शाहूंच्या कार्याची पुस्तिका नागरीकांच्या हातात देण्याचा प्रयत्न करावा. विषय पत्रिकेबाहेरील विषयावरुन सभा वादग्रस्त ठरली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने समिती स्थापन करुनही उपयोग झाला नाही. शिवाय शाहू व्याख्यानमाला का बंद करण्यात आली, सभेत असे प्रश्न उपस्थित झाल्याने शाहू आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
२ यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी अमृत महोत्सवातील समितीला विरोध दर्शविला. त्यावर नगराध्यक्षा माने यांनी सर्वांनी मिळून सुचविण्याचे आवाहन केले. सभेत बजेटवरुन मोठे प्रश्नचिन्ह
३ निर्माण झाल्याने सुमारे दिडतास झालेल्या चर्चेत दोन्ही आघाड्यामध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे अखेर स्वच्छता मोहीम हाती घेण्यावर एकमत झाले.