कर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन : जयंत पाटील : ३१ तारखेला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 08:02 PM2021-05-24T20:02:36+5:302021-05-24T20:05:51+5:30
Jayant Patil Kolhapur flood meeting : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. याबाबत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर-सांगलीला २०१९ मध्ये महापुराचा फटका बसला होता. गेल्या वर्षीदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. यंदादेखील पाऊस चांगला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा महापुरासारखी परिस्थिती येऊ नये यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, याच महिन्यात कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात मुख्य सचिव स्तरावर बैठक झाली आहे. त्यांनी कर्नाटकशी संपर्क ठेवला आहे. दोन्ही राज्यांच्या चर्चेतून व समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल.
या विषयावर ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील लोकप्रतिनिधी, महसूल व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झूम बैठक होणार आहे. यावेळी मांडल्या जाणाऱ्या सूचना अमलात आणल्या जातील.