Kolhapur: नरेंद्र मोदींच्या आसपास, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट हमखास
By समीर देशपांडे | Published: April 27, 2024 12:21 PM2024-04-27T12:21:43+5:302024-04-27T12:22:26+5:30
मोदी यांच्या सभेविषयी उत्सुकता, हेलिपॅडचा निर्णय रद्द
समीर देशपांडे
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जवळपास जाता येणार आहे. त्यासाठी पूर्ण अभ्यास करून संबंधितांची यादी तयार करण्यात आली असून त्यातूनही रूसवे, फुगवे होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहेत. मोदी हे कर्नाटकातून शनिवारी संध्याकाळी कोल्हापूर विमानतळावर येणार असून तेथून ते तपोवन मैदानावर येणार आहेत.
मोदी यांच्या या सभेविषयी उत्सुकता असून त्याची प्रशासकीय पातळीवरही जोरदार तयारी सुरू आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्याहून अधिकारीही येथे दाखल झाले आहेत. सध्या तपोवनवर सभेसाठीच्या मंडपाची युद्धपातळीवर उभारणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात दाखल झालेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी सात जणांची समिती तयार केली आहे. यामध्ये भाजपचे राज्य सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, युवासेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास यांचा समावेश आहे.
या सर्वांनी बसून तीन टप्प्यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मोदी यांना कसे भेटवता येईल, याचे नियोजन केले आहे. त्यानुसार १५ मान्यवर विमानतळावर त्यांचे स्वागत करतील. १५ जण त्यांचे ‘तपोवन’वर व्यासपीठाजवळ स्वागत करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रीगण वगळता ४० जण मंचावर असतील. पुन्हा जाताना मंचाशेजारी त्यांना निरोप देण्यासाठी वेगळे १५ तर विमानतळावर निरोप देण्यासाठी वेगळे १५ पदाधिकारी असतील. या माध्यमातून सर्वांना मोदी यांना जवळून भेटता यावे, असे नियोजन करण्यात आले आहे.
हेलिपॅडचा निर्णय रद्द
सुरुवातीला पंतप्रधान मोदी हे कोल्हापूर विमानतळावरून तपोवनवर हेलिकॉप्टरने येणार होते. त्यानुसार त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याच्या सूचनाही बुधवारी देण्यात आल्या होत्या. परंतु आता त्यात बदल झाला असून मोदी हे रस्त्याने ‘तपोवन‘वर येणार आहेत. हे अंतर ११ किलोमीटर आहे. त्यामुळे हेलिपॅडचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.