जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By admin | Published: May 18, 2015 11:46 PM2015-05-18T23:46:08+5:302015-05-19T00:20:57+5:30

हंगाम २०१५-१६ साठी खरिपाचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Planning of Kharif on the district of Pahatin in Hector | जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन

जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Next


हंगाम २०१५-१६ साठी खरिपाचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९० हजार हेक्टर खरीप पेरणी योग्य क्षेत्रापैकी दोन लाख ७६ हजार ६०० हेक्टरवर भात, ज्वारी, नागली, सोयाबीन, भुईमूग ही प्रमुख पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी हवामान विभागाकडून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खरीप हंगामाला जून महिन्यापासून सुरुवात होत असली, तरी जिल्ह्यात खरिपामध्ये मुख्य पीक असणाऱ्या भात पिकासाठी जिल्ह्याच्या बहुतांश भागात धूळवाफ पेरण्या केल्या जातात. यासाठी बियाणे वेळेत शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्यात भात पिकाखाली एक लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रांवर लावण होणार आहे. यासाठी महाबीज व शासकीय पातळीवर १५ हजार ७५८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
सोयाबीनच्या लागवडीखाली ७९ हजार हेक्टर क्षेत्रांवर यावर्षी पेरणी होणार आहे. सोयाबीनच्या बियाण्यांसाठी स्थानिक शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या सोयाबीनचा वापर बियाण्यांसाठी करण्याकरिता शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रबोधन करण्यात येणार आहे. सोयाबीन स्वपरागीकरणात विविधता असल्याने तीन-चार वर्षे बियाण्यांसाठी वापरता येते. यामुळे बियाणांचा खर्च वाचणार आहे, असेही सांगण्यात आले.
भुईमुगाच्या पिकाखाली यावर्षी ५८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी होणार आहे, तर नागली २२ हजार ७०० व ज्वारीची पाच हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. यावर्षी कोणत्याही पिकासाठी बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. या सर्व पिकांसाठी २४ हजार ४६६ क्विंटल बियाणे महाबीज व शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दरम्यान, तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. उसाच्या लागणीत घेण्यात आलेल्या आंतर पिकांचीही काढणी सुरू आहे. सध्या उसाच्या भरणीची कामे सर्वत्र जोरात सुरू आहेत. भरणी करताना रासायनिक खतांचा मात्राही दिला जात आहे.

तुर, मूग, उडीद पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. मात्र, ही पिके आंतरपिके म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. विशेषत: गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांत ती घेतली जातात. जास्त पावसाच्या तालुक्यांत ही पिके घेतली जात नाहीत. कारण जादा पावसाने यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ही पिके घेण्याचे इतर तालुक्यांतील शेतकरी टाळतात.



यंदाच्या खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे. बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि रायायनिक खतांची कमतरता भासणार नाही.
- डी. बी. पाटील,
करवीर तालुका कृषी अधिकारी

५प्रकाश पाटील, कोपार्डे

Web Title: Planning of Kharif on the district of Pahatin in Hector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.