नियोजनातील विषय .. स्टार ७९५.... लायसेन्सची मुदत संपलेल्यांना निर्बंध शिथिल होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:26+5:302021-06-11T04:17:26+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये अजूनही ...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्याचा परिणाम म्हणून अनेक वाहनधारकांच्या वाहन चालविण्याच्या परवाना (लायसेन्स) ची मुदत संपूनही नूतनीकरणासाठी कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर अल्प प्रमाणात असल्यामुळे शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्हा अजूनही राज्य सरकारने निर्बंध उठविण्याच्या वर्गवारीत चौथ्या गटात आहे. सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयही अपुऱ्या कर्मचारी संख्येवर सुरू आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यांनतर परिवहन कार्यालयाने ३० जूनपर्यंतची मुदत वाहन चालविण्याचा परवाना नूतनीकरणासाठी दिली आहे. ही मुदतही वरिष्ठ कार्यालय वाढवू शकते. अद्यापही जिल्ह्यात कोरोनाचे सरासरी १४०० ते १५०० रुग्ण रोज विविध कोविड रुग्णालयांत दाखल होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर ही कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. सद्यस्थितीत येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन नोंदणी ऑनलाइन प्रक्रियेने सुरू आहे. दिवसाकाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील ४० ते ५० वाहने नोंदविली जात आहेत. सद्यस्थितीत मर्यादित कर्मचाऱ्यांवर वाहनांची तपासणी, अत्यावश्यक सेवा, ऑक्सिजन टँकर सेवा, रुग्णवाहिका सेवा, ऑटोरिक्षा अनुदान वाटप संबंधित कार्यालयीन कामे कोरोनाच्या छायेत पार पाडावी लागत आहेत.
अशी घ्या अपाॅइंटमेंट
परिवहन आयुक्त कार्यालयाने www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथीमध्ये जाऊन शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आपण आपली कागदपत्रे अपलोड करू शकता. परीक्षेसाठी हवा तो दिवस व वेळ निवडू शकता. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी मूळ कागदपत्रांसह कार्यालयात संगणकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे. उत्तीर्ण झाल्यास ३० दिवसांनतर १८० दिवसांपर्यंत आपण पुन्हा पक्क्या अनुज्ञप्ती (लायसेन्स) साठी वरीलप्रमाणे नोंदणी करू शकता. लायसेन्स विभाग लवकरच कार्यान्वित होत आहे.
अत्यावश्यक सेवेतीलच वाहनांची नोंदणी
सद्यस्थितीत कोरोनाच्या कहरामुळे सर्वसामान्य वाहनधारकांची वाहन नोंदणी थांबली आहे. स्थिती पूर्ववत झाल्यानंतर अथवा जिल्ह्यातील निर्बंध हटविल्यानंतर दिवसाकाठी वाहन नोंदणीसाठी येणारी वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील ४० ते ५० वाहनांची नोंदणी होत आहे.
लायसेन्ससाठी कोटा असा
सध्या लायसेन्स विभाग पूर्ण बंद आहे. नियमित या विभागातून रोज २०० लर्निंग (कच्चे), तर २८० पक्के (पर्मनंट) लायसेन्सचा कोटा होता. येत्या काही दिवसांत जर जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आल्यास हा विभागही सुरू होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी देणेही गरजेची बाब आहे.
कोट
कोरोना काळातून आपण हळूहळू बाहेर पडत आहोत. परिवहन विभागाची जबाबदारी पाहता मर्यादित कर्मचारी संख्येत काम करणे शक्य होत नाही. वाहन तपासणी, अत्यावश्यक सेवा, ऑक्सिजन टँकर सुविधा, रुग्णवाहिका सुविधा, ऑटोरिक्षा अनुदान वाटप ही अत्यावश्यक कामे सुरू आहेत. ही सर्व कामे माझे कर्मचारी अधिकारी जीवावर उदार होऊन करीत आहेत.
- डाॅ. स्टीव्हन अल्वारीस , प्रादेशिक परिवहन अधिकारी