पेमेंट वसुलीबाबत नियोजन करणार

By Admin | Published: April 20, 2017 11:59 PM2017-04-20T23:59:05+5:302017-04-20T23:59:05+5:30

इचलकरंजीतील कापड दिवाळेप्रकरण : आज यंत्रमागधारकांची बैठक

Planning for payment collection | पेमेंट वसुलीबाबत नियोजन करणार

पेमेंट वसुलीबाबत नियोजन करणार

googlenewsNext

इचलकरंजी : पॉपलीन कापडाच्या खरेदी-विक्रीमध्ये अघोषित दिवाळे निघालेल्या जी. तलेसरा या व्यापारी फर्मकडे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांची सुमारे ५० कोटी रुपये व विटा येथील यंत्रमागधारकांची सुमारे पाच कोटी रुपये रक्कम थकीत असल्याचे उघडकीस येत आहे. शहरातील आतापर्यंतच्या सर्वाधिक दिवाळेप्रकरणी पेमेंट वसुलीचे नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अडत व्यापारी, दलाल व यंत्रमागधारकांची इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या आवारात व्यापक बैठक घेण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला.
पॉपलीन कापड खरेदी करून राजस्थानमधील बालोत्रा येथे पाठविणाऱ्या जी. तलेसरा या व्यापारी फर्मकडून पेमेंट अनियमित होत असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली होती. याबाबत गेले दोन दिवस शहर व परिसरामध्ये उलटसुलट चर्चा होती. शहरातील सर्वांत मोठे दिवाळे निघण्याच्या या घटनेमुळे पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्किरे, नगरसेवक सागर चाळके, संजय तेलनाडे, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, आदींनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे येथील गावभाग पोलिस ठाण्यामध्ये तलेसरा यांच्याविरोधात कापड घेऊन त्याचे पेमेंट केले नसल्याबद्दलची तक्रार बुधवारी दाखल झाली.
अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी हत्ती चौकात पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष हुक्किरे, नगरसेवक चाळके, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, दीपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, श्रीशैल कित्तुरे, सूरज दुबे, दत्ता टेके, आदींची बैठक झाली. या बैठकीत या प्रकरणात गुंतलेल्या यंत्रमागधारक व त्यांच्या रकमेचा अंदाज घेण्यात आला. तलेसरा यांच्या कापड खरेदी-विक्री व्यवहारात इचलकरंजीतील ११० कारखानदार व विटा येथील १७ कारखानदार गुंतले असून, या सर्वांची रक्कम सुमारे
५५ कोटी रुपये असल्याची माहिती हुक्किरे यांनी सांगितली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत अडत व्यापारी, कापड दलाल व संबंधित कारखानदार यांच्या स्वतंत्रपणे बैठका आज, शुक्रवारी घेण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)

बालोत्रा-राजस्थानला पथक रवाना
पॉपलीन कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत बालोत्रा येथे जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी कारखानदारांचे एक पथक बुधवारी रात्री उशिरा रवाना झाले. या पथकामध्ये तुकाराम साळुंखे, अनिल कांबळे, जयकुमार यळरुटे, फिरोज जमखाने, सुनील रसाळ, आप्पासाहेब मगदूम, आदींचा समावेश आहे. या पथकाकडून बालोत्रा येथे जाऊन तेथे असलेल्या जी. तलेसरा यांच्या मुख्य कार्यालयास भेट देणे व कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील रक्कम परत मिळविण्याबाबत तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेच्यावतीने देण्यात आली.

Web Title: Planning for payment collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.