(नियोजन विषय) शहरातील २२ हजार भाडेकरुंपैकी फक्त ४५३ पोलीस दप्तरी नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:54+5:302020-12-27T04:18:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील भाडेकरू रहिवाशांची नोंद पोलीस ठाण्यात बंधनकारक आहे; पण अशी नोंद करण्यास कोल्हापूरकर उत्सुक ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील भाडेकरू रहिवाशांची नोंद पोलीस ठाण्यात बंधनकारक आहे; पण अशी नोंद करण्यास कोल्हापूरकर उत्सुक नाहीत. शहरातील महानगरपालिकेकडे तब्बल २२ हजार ५०० भाडेकरुंची नोंद आहे. त्यापैकी शहरातील पोलीस ठाण्यात फक्त ४५३ भाडेकरुंची नोंद आहे. नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागातून शहरात आलेल्या भाडेकरुंची संख्या अधिक आहे. त्याशिवाय परप्रांतीय ४६, तर परदेशी विद्यार्थ्यांची संख्या १८ आहे.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार ३३६ इतकी आहे. शहरात चार पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित सुमारे ९ कि.मी.चा परिसर व्यापला आहे. महापालिकेकडे भाडेकरुंची संख्या सुमारे २२५०० नोंद आहे; पण शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी पोलीस ठाणे तसेच उपनगराचा ग्रामीणचा भाग असणारे करवीर पोलीस ठाणे अशा एकूण पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून फक्त ४५३ भाडेकरुंनी नोंद केली आहे.
तरीही कारवाई नाही
पोलीस ठाण्याकडे भाडेकरुंची नोंद करणे घरमालकाला बंधनकारक आहे. तरीही नोंद न केलेल्या घरमालकांवर कारवाई झालेली नाही. मोजक्याच घरमालकांनी नोंद केली.
इराण, इराकमधीलही भाडेकरू
शहरामध्ये शिवाजी विद्यापीठ असल्याने होस्टेलवरील नऊसह एकूण १८ इराण व इराक येथील परदेशी भाडेकरू विद्यार्थ्यांची नोंद राजारामपुरी पोलिसांत आहे. याच पोलीस ठाण्यात एकूण १९३ भाडेकरुंची नोंद आहे. त्यामध्ये कर्नाटकातील २४, तर इतर महाराष्ट्रातील आहेत. जुना राजवाडा पोलिसांत १२६ भाडेकरुंची नोंद आहे. त्यामध्ये २१ बिहार व राज्यस्थान राज्यांतील कारागीर आहेत. शाहूपुरी हद्दीत १२५ व लक्ष्मीपुरी हद्दीत फक्त ०३ स्थानिक भाडेकरुंची नोंद आहे.
कोट..
घरमालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात नोंदविणे बंधनकारक आहे. शहरातून नोंदी खूप कमी प्रमाणात पोलिसांकडे झाल्या. कुळाच्या नोंदी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. - मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर.
- शहराची लोकसंख्या : ५,५४,२३६
- महापालिकेकडे नोंद भाडेकरू : २४,५००
- पोलीस ठाण्यात नोंद भाडेकरू : ४५३