प्लॅनिंग विषय - आला कोरोना.. पळाले आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:28+5:302021-01-08T05:13:28+5:30
कोल्हापूर : कमी खर्चातील खात्रीशीर उपचार मिळणाऱ्या आणि विशेषकरून गरिबांचे रुग्णालय असलेल्या येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) दररोज ...
कोल्हापूर : कमी खर्चातील खात्रीशीर उपचार मिळणाऱ्या आणि विशेषकरून गरिबांचे रुग्णालय असलेल्या येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) दररोज रुग्णांची मोठी गर्दी उसळलेली असते. परंतु कोरोनाच्या काळात सर्वसाधारण आजारांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या पन्नास ते साठ टक्क्यांनी घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जेव्हा कोरोनाचे संक्रमण कोल्हापुरात सुरू झाले, तेव्हापासून केवळ कोरोनावरील उपचाराकरिता संपूर्ण सीपीआर रुग्णालय राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नंतर सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता तेथील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) एप्रिलपासून कसबा बावडा परिसरात असलेल्या सेवा रुग्णालयात हलविण्यात आला तरीही सर्वसाधारण आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली.
२०१८ च्या तुलनेत पंच्याहत्तर टक्के, तर २०१९ च्या तुलनेत पन्नास ते साठ टक्क्यांनी ही रुग्णसंख्या घटली. कोरोनाबद्दलची मनात असलेली प्रचंड भीती आणि आपल्यापासून कुटुंबालाही धोका नको म्हणून त्यांनी ‘सीपीआर’कडे जाण्याचे टाळले. सेवा रुग्णालयात पर्यायी व्यवस्था केल्यानंतरही रुग्णांनी तिकडे न जाता, फॅमिली डॉक्टरांकडून ‘टेलिमेडिसीन’चा वापर करत घरीच उपचार घेतले. काहींनी घरगुती उपचार करून आलेल्या आजारांना परतवून लावले.
- रुग्ण घटले, ताण कमी झाला-
कोरोनाच्या भीतीमुळे जरी ‘सीपीआर’कडील सर्वसाधारण आजारांचे रुग्ण कमी झाल्यामुळे यंत्रणेवरील ताण खूप कमी झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी आल्या नाहीत. रोज साडेचारशे कोरोना रुग्णांवर अव्याहतपणे उपचार करण्याकडे सीपीआर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. अशा महामारीतसुद्धा या रुग्णालयाने खात्रीशीर उपचार देऊन आपली विश्वासार्हता जपली.
- शस्त्रक्रिया, प्रसूती प्रथमच बंद-
या रुग्णालयाच्या स्थापनेपासून सुरू असणाऱ्या सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया व प्रसूती विभाग कोरोनाकाळात प्रथमच बंद ठेवण्यात आले. एप्रिल ते नोव्हेंबर यादरम्यान एकही शत्रक्रिया रुग्णालयात झाली नाही. कोरोनाबाधित महिला रुग्णाकरिता मात्र प्रसूती विभाग सुरू राहिला.
-आजारी पडण्याचे प्रमाणही कमी-
रोज माणसांना काही ना काही आजार होत असतात; परंतु लॉकडाऊन आणि कोरोना यामुळे बहुसंख्य लोकांना सात्त्विक, सकस आहार खाण्याची, पुरेशी विश्रांती घेण्याची तसेच हलका व्यायाम करण्याची सवय लागली. परिणामी लोकांची प्रकृती उत्तम राहिली. आजारी पडण्याचे प्रमाण त्यामुळे कमी झाले.
महिना २०१८ २०१९ २०२०
जानेवारी २९,७४६ १५,६८० --
फेब्रुवारी २८,९५३ १३२०६ --
मार्च ३२,१४९ १३,०३० ९७२७
एप्रिल २९,२८२ ११,७५६ ५१३४
मे २८,३१२ १२,१४७ १४,२६६
जून २७,२१७ ११,१३४ १०,८६२
जुलै २५,४४५ १३,०६७ ११,८३२
ऑगस्ट २३,७४९ ९५८९ ९३०१
सप्टेंबर २३,५२८ ११,४९९ ६२४९
ऑक्टोबर २४,८२१ १२,०६४ ३०१८
नोव्हेंबर २०,६६६ १४१९७ ५५००
डिसेंबर २४,६९० १३६६३ --