(नियोजन विषय) कोरोनाशी लढायचं हाय, ५७ टक्के पोलिसांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:03+5:302021-03-22T04:22:03+5:30
कोल्हापूर : कोरोना लढ्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील ५७.३० टक्के पोलिसांनी पुढाकार घेत स्वत:चे ...
कोल्हापूर : कोरोना लढ्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलातील ५७.३० टक्के पोलिसांनी पुढाकार घेत स्वत:चे लसीकरण करून घेतले. कोणतेही संकट झेलण्यासाठी नेहमीच पोलिसांचा पुढाकार असतो. शासनाच्या इतर विभागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात टाळाटाळ होत असताना, पोलीस मात्र लसीकरणात अग्रेसर आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, तसा नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलिसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून ‘फ्रंट लाईन वॉरिअर’ म्हणून कर्तव्य बजावले. कोरोनाचा प्रादुर्भाव किती घातक आहे, याचा अनुभव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे कोरोनाने बळी गेले, तर अनेकांना कोरोनाने गाठले, तसे ते सहिसलामत बाहेरही पडले. जिल्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची एकूण २९७२ अशी संख्या आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश देताच कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनीही टप्प्या-टप्प्याने स्वत:हून लसीकरण केंद्र गाठून लस घेतली. लसीकरण तूर्त तरी ऐच्छिक असले तरीही, जिल्ह्यातील १०० टक्के पोलिसांनी लसीकरण करून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली. आतापर्यंत १७१ पोलीस अधिकाऱ्यांपैकी ९३ अधिकाऱ्यांनी लस घेतली, तर २८०१ पोलिसांपैकी १६१० म्हणजेच ५८ टक्के पोलिसांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे लवकरच पोलिसांचे शंभर टक्के लसीकरण होणार, हे निश्चित.
६४ टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
कोरोना संकटात रात्रं-दिवस महिला पोलिसांनीही एक पाऊल पुढे राहून काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण तितकेच आवश्यक आहे. कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत करत त्यांनी कोरोनावर मात केली आहे. भविष्यातील कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण करून घेण्यात महिला पोलीसच अग्रभागी दिसत. कोल्हापूर पोलीस दलात आतापर्यंत सुमारे ६४ टक्के महिलांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
दुसरा डोस घेतला १९ टक्के पोलिसांनी
आतापर्यंत २३ पोलीस अधिकाऱ्यांनी, तर ५६५ पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे १९.०१ इतके चांगले झाले आहे.
पॉईंटर :
- जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी : १७१
- लस घेतलेले अधिकारी : ९३
- जिल्ह्यात एकूण पोलीस कर्मचारी संख्या : २८०१
- लस घेतलेले पोलीस कर्मचारी : १६१०